Me Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार' या स्टार प्रवाहवरील कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमातील लायन्स आणि मायन्स थ्री या दोन्ही ग्रुपने 'वर्ल्ड हिप हॉप' स्पर्धेत चमक दाखवली आहे. या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत लायन्स ग्रुपने कांस्यपदक पटकावलं आहे. तर मायनस थ्री हा ग्रुप दहावे स्थान गाठण्यात यशस्वी झाला आहे. भारतीयांसाठी ही आनंदाची बाब आहे.
स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमातील स्पर्धकांच्या टॅलेण्टचे परिक्षण करण्याची धुरा अंकुश चौधरी, कॅप्टन्स कृती महेश आणि वैभव घुगे करत आहेत. तर संस्कृती बालगुडे सुत्रसंचालन करताना दिसून येत आहे. प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवे असते एक हक्काचे व्यासपीठ. त्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. अशाच नृत्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमाचा मंच मदतीचा ठरतो आहे. याच मंचावर आतापर्यंत महाराष्टातील कानाकोपऱ्यातून आलेल्या 60 स्पर्धकांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. तर त्यातील चार स्पर्धक महाअंतिम फेरीत दाखल झाले आहेत. त्यांच्यातील एक स्पर्धक सुपरस्टार होणार आहे.
कोरोनाच्या संकटानंतर अनेक कलाकारांना नव्याने सुरूवात करण्यासाठी 'मी होणार सुपरस्टार' हा कार्यक्रम म्हणजे एक संधी होती. आता तर याच स्पर्धेतील लायन्स ग्रुप आणि मायनस थ्री ग्रुपने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. गेली अनेक वर्षे हे दोन्ही ग्रुप हिप हॉप हा नृत्यप्रकार सादर करीत आहेत. 'वर्ल्ड हिप हॉप' स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करावे हा विचार करत त्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. याआधी लायन्स आणि मायनस या दोन्ही गंटांनी भारतात होणाऱ्या हिप हॉप स्पर्धेत बाजी मारली होती. त्यामुळेच त्यांना 'वर्ल्ड हिप हॉप' स्पर्धेत सहभागी होता आले होते. लायन्स हा सात जणांचा ग्रुप आहे. 'वर्ल्ड हिप हॉप' स्पर्धेत त्यांनी अडल्ट क्रु या नृत्यप्रकाराचे सादरीकरण केले होते. तर मायनस थ्री या ग्रुपने मिनी क्रु नृत्यविभागात सहभाग घेतला होता.
'वर्ल्ड हिप हॉप' ही स्पर्धा दरवर्षा अमेरिकेत होत असते. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होती. या स्पर्धेत 170 देशांनी एन्ट्री पाठवल्या होत्या. अटीतटीच्या या स्पर्धेत लायन्स आणि मायनस थ्री या दोन्ही ग्रुपची निवड होणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. 'मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा' या स्पर्धेत सुपरस्टार होण्याचा मान कोण मिळवणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे.
लायन्स टीमचा नृत्यदिग्दर्शक बालाजी म्हणाला, "मागील वर्षी आपण या स्पर्धेत ५२ व्या क्रमांकावर होतो. ही गोष्ट मनाला लागली होती. भारताला तिथून पहिल्या क्रमांकावर आणणे हे आमचे स्वप्न होते. कांस्य पदक आणि रौप्य पदक यांचे एकूण गुण सारखेच होते. तर गोल्ड मेडल मिळालेल्या संघात आणि लायन्सच्या परफॉर्मन्स मध्ये फक्त 0.12 टक्के इतका छोटा फरक होता. पुढच्या वर्षी सुवर्णपदक आणायचे आमचे ध्येय आहे".
मायनस थ्री ग्रुपचा सुजिन म्हणाला, "पहिल्या प्रयत्नामध्ये आम्ही टॉप 10 मध्ये येणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी ही गोष्ट प्रेरणा देणारी आहे".