Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना आता तीन आठवडे होऊन गेले आहेत. पण घरातील स्पर्धक एलिमिनेशनच्या फेरीसाठी अजून सज्ज झालेले नव्हते. आज बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडणार आहे. त्यामुळे घरातील कोणता सदस्य पहिला बाहेर पडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. घरातील स्पर्धक कितीही भांडणं करत असले, एकमेकांवर आरडाओरडा करत असले तरी एकमेकांबाबत त्यांच्या मनात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी नक्कीच आहे. त्यामुळे आज कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार हे स्पर्धकांना कळलेले नसाताना देखील स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी दिसतयं. 


पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेत तृप्ती ताई, दादूस, अक्षय, सुरेखा, स्नेहा, विशाल नॉमिनेट झाले होते. त्यातील स्नेहा आणि विशाल सेफ असल्याचे महेश मांजरेकरांनी कालच्या भागात जाहीर केले. त्यामुळे तृप्ती ताई, दादूस, अक्षय, सुरेखा या चौघांपैकी एक सदस्य आज कायमचा बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार आहे. 


बिग बॉसच्या घरात आज भोपळे फोडले जाणार आहेत. डोक्यावर भोपळा फोडून स्पर्धक राग व्यक्त करताना दिसून येणार आहेत. गायत्री मीनलच्या डोक्यात भोपळा फोडणार आहे, मीनल गायत्रीच्या डोक्यावर भोपळा फोडणार आहे, स्नेहा मीराच्या डोक्यावर भोपळा फोडणार आहे, तर मीराला महेश मांजरेकर भोपळा फोडायला सांगतात तेव्हा मीरा म्हणते, मला नाही फोडायचा आहे कोणाच्या डोक्यावर, खरतरं मला सगळ्यांच्याच डोक्यावर भोपळा फोडावसा वाटतो आहे. अशापद्धतीने स्पर्धक एकमेकांच्या डोक्यावर भ्रमाचे भोपळे फोडताना दिसून येणार आहेत.


स्पर्धकांच्या चाहत्यांनी स्पर्धकांकडे चुगलीदेखील केली आहे. त्यामुळे कोणता सदस्य कोणाची कोणाकडे चुगली करत होता ते त्या त्या स्पर्धकांना कळत होते. महेश मांजरेकरांनी चावडीवर काल अनेकांची शाळा घेतली होती. त्यानंतर आज मांजरेकर कोणत्या स्पर्धकाची शाळा घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


बिग बॉस मराठी रहिवासी संघात आज एका नवीन स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने नुकताच प्रोमो शेअर केला आहे. त्यामुळे आता घरात कोणता सदस्य जाणार, घरात जाऊन तो कोणाच्या गटात सामिल होणार, की स्वत:च नवीन गट निर्माण करणार, बिग बॉसच्या घरातील सदस्य नव्या सदस्याचा स्वीकार करणार का? अशा अनेक चर्चा प्रेक्षकांमध्ये होत आहेत.