Bigg Boss Love stories : आजपासून (1 ऑक्टोबर) पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ हा विवादित शो आपल्या नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस’च्या या 16व्या (Bigg Boss 16) सीझनमध्ये काय खास असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना देखील लागून राहिली आहे. तर, यंदा घरात कोणती जोडी पाहायला मिळणार किंवा कोणती नवी जोडी तयार होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे. या आधीच्या सगळ्याच सीझनमध्ये कलाकारांच्या काही जोड्या चर्चेत आल्या. या घरात जुळलेले प्रेमबंध घराबाहेर पडल्यावर आणखी दृढ झाले. तर, काहींचे नाते मात्र मात्र बाहेर पडताच संपुष्टात आले. मात्र, या जोड्यांनी बिग बॉसचे सीझन गाजवले. चला तर, जाणून घेऊया अशाच काही जोड्यांबद्दल...


तेजस्वी प्रकाश-करण कुंद्रा (Tejasswi Prakash- Karan Kundrra)


‘बिग बॉस सीझन 15’ मधील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा. दोघांची लव्हस्टोरी अजूनही खूप चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावरही सोशल मीडियावर ही जोडी आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असते. या जोडीला आता आई-वडिलांचाही आशीर्वाद आणि कुटुंबांची मान्यता देखील मिळाली आहे. आता ही जोडी लग्नबंधनात कधी अडकणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.



असीम रियाझ-हिमांशी खुराना (Asim Riaz-Himanshi Khurana)


‘बिग बॉस 13’ दरम्यान असीम रियाझ आणि हिमांशी खुरानाही एकमेकांच्या प्रेमात पडले. ही जोडी ‘बिग बॉस सीझन 13’ मधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक होते. पण, या शोमध्ये येण्यापूर्वीच हिमांशी एका व्यक्तीसोबत 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. याशिवाय त्यांचा साखरपुडाही झाला होता. पण, बिग बॉस शोमध्ये एंट्री घेतल्यानंतर तिची असीम रियाजसोबतची जवळीक वाढू लागली, त्यामुळे तिने तिचा साखरपुडा देखील मोडला. त्यानंतर हिमांशी आणि असीम एकमेकांना डेट करू लागले.



शहनाज गिल-सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla- Shehnaaz Gill)


‘बिग बॉस 14’मध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल देखील एकमेकांच्या खूप जवळ आले होते. चाहत्यांमध्ये ही जोडी ‘सिदनाझ’ म्हणून प्रसिद्ध होती. दोघांनीही एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली नसली तरी, दोघांचेही प्रेम चाहत्यांना दिसत होते. मात्र, सिद्धार्थच्या अचानक जाण्याने ही जोडी तुटली. मात्र, आजही शहनाज सिद्धार्थच्या आठवणींमध्ये रमलेली दिसते.



पवित्रा पुनिया-एजाज खान (Pavitra Punia and Eijaz Khan)


‘बिग बॉस सीझन 14’मधील आणखी एक चर्चित कपल म्हणजे पवित्रा पुनिया आणि एजाज खान. सुरुवातीला दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. पण शो संपण्यापूर्वी दोघांमध्ये चक्क प्रेम फुलले. पवित्रा पुनियाला घरातून बेघर झाल्यावर दोघांनाही आपल्या प्रेमाची जाणीव झाली. एका विकेंडदरम्यान पवित्रा एजाजला भेटायला आली आणि तिने तिचे प्रेम व्यक्त केले. शोनंतरही ही जोडपे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहे.



अली गोनी-जास्मिन भसीन (Aly Goni- Jasmin Bhasin)


अभिनेता अली गोनी आणि अभिनेत्री जस्मिन भसीन हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, या दोघांनी ‘बिग बॉस 14’च्या घरात एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. तेव्हापासून ही जोडी इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक बनली आहे.



संबंधित बातम्या


Salman Khan: 'बिग बॉससाठी घेतलं कोट्यवधींचे मानधन?' सलमान म्हणाला, 'एवढे पैसे मिळाले तर आयुष्यभर...'


Bigg Boss 16 : युट्यूबर अब्दु राजिक होणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये सहभागी; व्हिडीओ व्हायरल