'बिग बॉस तामिळ'च्या सेटवर दुसऱ्या मजल्यावरुन पडून तंत्रज्ञाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 09 Sep 2018 01:45 PM (IST)
'बिग बॉस तामिळ 2' या रिअॅलिटी शोच्या सेटवर दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे एसी टेक्निशियनला प्राण गमवावे लागले.
NEXT PREV
चेन्नई : 'बिग बॉस तामिळ 2' या रिअॅलिटी शोच्या सेटवर एका तंत्रज्ञाचा अपघाती मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे एसी टेक्निशियनला प्राण गमवावे लागले. प्रसिद्ध अभिनेते कमल हसन सूत्रसंचालन करत असलेला 'बिग बॉस तामिळ 2' अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. चेन्नईतील चेंबरम्बक्कममधील ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये या शोचं शूटिंग सुरु आहे. शनिवारी गुणशेखर नावाचा तंत्रज्ञ एसीची दुरुस्ती करत होता. मात्र पाय घसरुन तो दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. गुणशेखरला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्याचं निधन झालं. या प्रकरणी नाझरपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 'बिग बॉस तामिळ'च्या पहिल्या पर्वाच्या शूटिंगवेळीही एका तंत्रज्ञाचं निधन झालं होतं. मुंबईच्या 28 वर्षीय प्लंबरचा फीट आल्यानंतर मृत्यू झाला होता.