मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज (5 सप्टेंबर) निधन झालं. पहाटे झोपेतच त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 72 वर्षांच्या होत्या.


गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह देखील होता. त्यातच शुभांगी जोशी यांना मागील आठवड्यात शनिवारी पॅरालिलीसचा अटॅक आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. व्हेंटिलेटवर असलेल्या शुभांगी जोशी यांची आज पहाटे प्राणज्येत मालवली.

झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. शुभांगी जोशी यांनी 'काहे दिया परदेस' मालिकेतील गौरीच्या आजीची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेमधील त्यांचे मालवणी भाषेतील संवाद, गौरीचे बाबा अर्थात मोहन जोशींच्या भूमिकेशी छोटे-मोठे वाद प्रेक्षकांना आवडत होते.

'आभाळमाया'सारख्या मालिकेपासून अगदी आताच्या 'कुंकू, टिकली आणि टॅटू' या मालिकेतही शुभांगी जोशी काम करत होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने सहकलाकारांना धक्का बसला आहे.