मुंबई : सलमान खानच्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या बाराव्या सिझनला दणक्यात सुरुवात झाली. ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे, भजनसम्राट अनुप जलोटा, क्रिकेटपटू श्रीशांत यांच्यासह 17 स्पर्धक बिग बॉसच्या घरात पुढील 100 दिवसांसाठी कैद झाले आहेत.


'विचित्र जोड्या' अशी यंदाच्या बिग बॉसची थीम असून सेलिब्रेटींसह सामान्य नागरिकांचाही या पर्वात समावेश आहे. सहा जोड्या आणि पाच सोलो स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवलं. बीच थीम असलेल्या बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर 89 कॅमेरांची नजर असेल.

भजनसम्राटांची शिष्येसोबत एन्ट्री

65 वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा यांनी 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथरुसोबत बिग बॉसच्या घरात गृहप्रवेश केला आहे. अनुप जलोटा यांचं यापूर्वी तीन वेळा लग्न झालं होतं. तिसरी पत्नी मेधा जलोटा यांच्या निधनानंतर अनुप जलोटा यांनी पुन्हा नव्या नात्याला सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांपासून जसलीनसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली त्यांनी शोमध्ये दिली.



मराठमोळी ग्लॅमगर्ल नेहा पेंडसे

अभिनेत्री नेहा पेंडसेने 'भाग्यलक्ष्मी' या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती, तर 'एकापेक्षा एक अप्सरा आली' या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही मजल मारली होती. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. 1996 मधील 'हसरतें' या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर 'मे आय कम इन मॅडम?' या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती. त्याशिवाय तिने तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम सिनेमातही काम केलं आहे.



बिग बॉसच्या घरात कोण कोण?

अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिम : दीपिकाने 'ससुराल सिमर का' मालिकेत केलेली भूमिका प्रचंड गाजली होती. गेल्या वर्षी ती सहकलाकार शोएब इब्राहिमसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. दीपिका आणि शोएब एकत्र एन्ट्री घेतील, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी शोएब घरी थांबल्याचं म्हटलं जातं. दीपिकाला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वाधिक मानधन मिळाल्याची चर्चा आहे. तिच्याकडे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातं.

अभिनेता करणवीर बोहरा : 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील प्रेमच्या व्यक्तिरेखेमुळे करणवीर सर्वप्रथम प्रसिद्धीस आला. सौभाग्यवती भव, कुबूल है आणि सध्या नागिन 2 मालिकांतील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत.

अभिनेत्री सृष्टी रोडे : 'बिग बॉस'च्या घरात टीव्ही कलाकारांचं कायमच वर्चस्व राहिलं आहे. इष्कबाज, छोटी बहू 2 आणि सरस्वतीचंद्र मालिकेत सृष्टीने काम केलं आहे

माजी क्रिकेटपटू श्रीशांत : 2013 साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीशांत दोषी आढळला होता. त्यानंतर बीसीसीआयने श्रीशांतवर आजन्म बंदी घातली. क्रिकेट सोडल्यानंतर श्रीशांतने आपला मोर्चा मनोरंजन विश्वाकडे वळवला. हा त्याचा तिसरा रिअॅलिटी शो आहे. यापूर्वी तो 'झलक दिखला जा 7' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये, तर 'खतरों के खिलाडी 9' या अॅक्शन रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला.

सामान्य नागरिक :

पोलिस कर्मचारी निर्मल सिंग आणि वकील रोमिल चौधरी (हरियाणा) - मित्र
शेतकरी सौरभ पटेल आणि बिझनेसमन शिवाशिष मिश्रा (मध्य प्रदेश) - मित्र
'गँग्ज ऑफ वासेपूर' फेम गायक दीपक ठाकूर आणि त्याची चाहती उर्वशी वाणी
सबा खान आणि सोमी खान - बहिणी (राजस्थान)

पब्लिक वोटिंगद्वारे आऊटहाऊस विजेते -

रश्मी बनिक (कोलकाता)
रोडीज् स्पर्धक कृती वर्मा