मुंबई : नुकत्याच झालेल्या 'बिग बॉस 12'ची विजेती ठरलेली टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. बिग बॉसमधील दीपिकाच्या वर्तनाने चिडलेल्या प्रेक्षकाने तिला ट्विटरवरुन धमकी दिली आहे. दीपिकाने मुंबई पोलिसांकडे या प्रकरणी मदत मागितली आहे.


नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या बाराव्या पर्वाचं विजेतेपद अभिनेत्री दीपिका कक्करला मिळालं. दीपिकाने अत्यंत सन्मानाने ट्रॉफी मिळवल्याचं काही चाहत्यांचं मत आहे, तर कोणाला ती अयोग्य पद्धतीने खेळत होती, असं वाटतं. क्रिकेटपटू श्रीशांतच्या पराभवाने सरभरलेल्या एका प्रेक्षकाने ट्विटरवर दीपिकाला अॅसिड हल्ल्याची धमकी दिली आहे.

'किती घाणेरडी बाई आहेस तू मख्खी (दीपिकाने साकारलेली व्यक्तिरेखा) तू एकदा लाईव्ह ये घटस्फोटित बाई, तुला इतकं ट्रोल करु की बघच. तू हद्द केलीस, आता तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर आम्ही हल्लाबोल करु. तू आणि मी मुंबईत आहोत. तू दिसलीस तर तुझ्यावर अॅसिड फेकेन' असं या यूझरने तोडक्या-मोडक्या हिंदीत लिहिलं आहे.


दीपिकाच्या फॅनपेजकडून मुंबई पोलिसांकडे मदत मागण्यात आली आहे. 'मुंबई पोलिस, ही व्यक्ती दीपिकावर अॅसिड हल्ल्याची धमकी देत आहे. लवकरात लवकर त्याला अटक करा' असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बिग बॉस 12 च्या  विजेतेपदासाठी दीपिका कक्कर, श्रीशांत, दीपक ठाकूर, करणवीर बोहरा, रोमील चौधरी हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र करणवीर सर्वात आधी फायनलमधून बाहेर फेकला गेला. अंतिम तिघांमध्ये दीपिका, श्रीशांत आणि दीपकमध्ये चुरस होती. यावेळी दीपकने 20 लाख रुपये घेत स्वतःहून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. श्रीशांतला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे त्याचे अनेक चाहते नाराज झाले.