मुंबई : बिग बॉस मराठीच्या यशानंतर दुसऱ्या सीजनची लोक प्रेक्षक वाट पाहत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बिग बॉस मराठीच्या दुसरा सीजन लांबणीवर पडला आहे. मात्र आता बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण बिग मराठी दुसऱ्या सीजनचा प्रोमो उद्या रिलीज होणार आहे.


कलर्स मराठी चॅनेलने आपल्या इन्स्टाग्रामवरील ऑफिशियल अकाऊंटरुन पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. "उद्या चर्चेला उधाण येणार... कारण महेश मांजरेकर घेऊन येत आहेत, बिग बॉस मराठी-2 चा प्रोमो येत आहे. स्टे ट्यून.." अशी पोस्ट कलर्स मराठीने केली आहे.

या पोस्टमध्ये महेश मांजरेकर  यांचाही हटके लूक दिसत आहे. देशात निवडणुकीचं वातावरण आहे, त्यामुळे महेश मांजरेकरांनीही तसाच पॉलिटिकल लूक केल्याची चर्चा आहे. अंगात कुर्ता, जॅकेट डोक्यावर गांधी टोपी असा लूक महेश मांजरेकरांनी केला आहे.


बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर, चाहते मागील वर्षापासूनच नव्या मोसमाची वाट पाहत होते. मागील वर्षी 15 एप्रिल रोजी बिग बॉसचं पहिलं पर्व ऑनएअर गेलं होतं. पण यंदा निर्मात्यांनी 14 एप्रिल आणि 21 एप्रिल या दोन तारखांचा लॉन्चिंगसाठी प्रस्ताव ठेवला होता. आता लोकसभा निवडणुकीमुळे प्रेक्षकांना मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

आता पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांचं जबरदस्त सूत्रसंचालन, मराठी कलाकारांची दोस्ती-यारी आणि वाद-विवाद पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.