मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीजनचा प्रोमो आज प्रदर्शित झाला आहे. प्रोमोनंतर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीजनची उत्सुकता आणखीच वाढली आहे. कलर्स चॅनलने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रोमो रिलीज केला आहे.
बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये नेमकं कोण सहभागी होणार याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र प्रोमो पाहिल्यानंतर एक मोठं राजकीय व्यक्तीमत्व या सीजनमध्ये सहभागी होणार की काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. प्रोमोमध्ये देखील एक राजकीय नेता जनतेसमोर भाषण देताना दिसत आहे. त्यामुळे एखादा राजकीय नेता दुसऱ्या सीजनमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रोमोमधील महेश मांजरेकरांचं एक वाक्य ऐकल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं नाव पटकन समोर येत. "हे कवी मनाचे नेते होणार का, बिग बॉसचे विजेते" या एका वाक्यामुळे रामदास आठवले या सीजनमध्ये बिग बॉसमध्ये सहभागी होतात, की काय या चर्चांना उधाण आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले बिग बॉससाठी वेळ देतील, ही शक्यता फार कमी आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील कवी मनाचे नेते कोण आहेत? हे सर्वांचा ठाऊक आहे. त्यामुळे बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमधील हे कवी मनाचे नेते कोण आहेत, हे लवकरच समोर येईल.
"शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का बिग बॉस सीजन 2 च्या घरात वर्दी?", असं कॅप्शन देत बिग बॉस-2 चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर, चाहते मागील वर्षापासूनच नव्या मोसमाची वाट पाहत होते. मागील वर्षी 15 एप्रिल रोजी बिग बॉसचं पहिलं पर्व ऑनएअर गेलं होतं. पण यंदा निर्मात्यांनी 14 एप्रिल आणि 21 एप्रिल या दोन तारखांचा लॉन्चिंगसाठी प्रस्ताव ठेवला होता. आता लोकसभा निवडणुकीमुळे प्रेक्षकांना मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.
VIDEO | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाजलेल्या कविता