मुंबई : बिग बॉसच्या घरातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नॉमिनेशन प्रक्रिया. या नॉमिनेशन प्रक्रियेत जे सदस्य नॉमिनेट होतात त्यातल्या एका सदस्याला विकेंडच्या डावाच्या शेवटी घर सोडून जावे लागते.

काल बिग बॉसच्या घरातली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी दोन सदस्यांना उभं करुन या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कोणी किती चुका केल्या आहेत आणि कोण किती प्रामाणिकपणे खेळ खेळलं आहे याचा आढावा घ्यायचा होता. त्याचप्रमाणे आपल्या विरुद्ध उभा असलेला प्रतिस्पर्धी या घरात राहण्यासाठी कसा अपात्र आहे हे देखील सिद्ध करायचे होते. या खेळात जो सदस्य अपात्र ठरेल त्याला नॉमिनेट करुन त्याची रवानगी थेट नरकात करण्यात आली, तर जो सदस्य या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेपासून सेफ झाला त्याला स्वर्गात पाठवण्यात आले.

या खेळात कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याची जबाबदारी या आठवड्याचा कॅप्टन शीव ठाकरेवर होती. तर या प्रक्रियेदरम्यान नेहा शितोळे आणि माधव देवचके हे शीवचे सल्लागार होती. या खेळादरम्यान असलेले दोन्ही सल्लागार हे एकाच ग्रुपमधले होते, त्यामुळे या सल्लागारांनी स्वतःच्या अख्ख्या ग्रुपला नॉमिनेशन पासून वाचवले, परिणामी पराग, वीणा, रgपाली, किशोरी आणि हिना हे सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले.

एकाच ग्रुपमधले सदस्य सल्लागार म्हणून नेमल्यामुळे बिग बॉसचा कालचा खेळ खूपच एकांगी झाल्याची भावना प्रेक्षकांमध्येही निर्माण झाली आहे. या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी वीणा, पराग, रुपाली, किशोरी आणि हिना हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. दर आठवड्याला सहा सदस्यांची नावं या प्रक्रियेसाठी निश्चित होतात. सध्यातरी पाचच नावं निश्चित झाली आहेत. आता सेफ झालेल्या सदस्यांपैकी आणखी कोण नॉमिनेट होणार हे आज कळेलच.

एकूण खेळातला सहभाग खेळण्याचा प्रकार बघता सेफ झालेल्या सदस्यांपैकी सुरेखा पुणेकर किंवा माधव देवचके हे नॉमिनेट होऊ शकतात. जर हे दोघे नॉमिनेट झाले तर या आठवड्याच्या शेवटी या दोघांपैकी कोणालातरी घराचा निरोप घ्यावा लागू शकतो. कारण उर्वरीत पाच सदस्यांपैकी वीणा, पराग, रुपाली हे उत्तम खेळाडू आहेत तर हिना एक आठवड्यापूर्वीच घरात आल्याने इतक्यात तरी तिला घराबाहेर काढणार नाहीत.