तर राणा दा परत येतोय. होय खरंच. कसा? तर ह्यो असा. झी मराठीवरच्या नव्या प्रोमोमध्ये तोडफोड करणारा रावडी राठोड आपला राणा दाच आहे. काय गोंधळलात ना? आता हा प्रोमो बघून तुम्हाला वाटेल हे काय नवीन. पण विश्वास ठेवा, हा आपला राणा दाच आहे.
आणि तो परत ही येतोय. शेवटी राणा दा आहे तो. त्याचा कमबॅक त्याच्याइतकाच जबरदस्त असायला हवा, नाही का? महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोळा भाबडा असणारा आपला राणा दा आता मात्र अट्टल पाकिटमार आणि टपोरी अंदाजात दिसणार आहे, ते पण एकदम आण्णा स्टाईल. जे आजवर साऊथच्या सिनेमात दिसत होतं ते आता मराठी मालिकेत दिसणार आहे बरं का?
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणादा खरंच बदलणार!
मालिकेच्या सुरुवातीला भोळा भाबडा दिसणारा राणा दा आता मात्र अस्सल साऊथ इंडियन लूकमध्ये फूल ऑन राडा करणार हे त्याच्या या हटके लूकवरुनच लक्षात येतंय. या बदललेल्या लूकसोबत राणा दाचं नावही बदललं आहे बरं का?. काय आहे राणा दाचं नवं नाव? तर त्याचं नाव आहे राजा राजगौंडा. हा राजा राजगौंडा येत्या 28 जून रोजीत मालिकेत धडकणार आहे.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादाची एक्झिट?
आता हा राजा राजगौंडा म्हणजे आपला गायब झालेला राणा दा आहे का? जर हो तर मालिकांच्या परंपरेला अनुसरुन यातही राणा दा स्मृतीभ्रंश झालेला दाखवणार का? सतत वहिनीच्या ताटाखालचं मांजर बनलेला राणा दा या वेशात वहिनीला धडा शिकवणार का? अंजली आणि राणाची म्हणजेच आता राजा राजगौंडाची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिका जशजशी पुढे सरकेल तशी मिळतीलच.