एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कौन बनेगा करोडपती’ शोचं शूटिंग सुरु असताना, बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत अचानक बिघडली. शूटिंग दरम्यान, त्यांना घशामध्ये खूप त्रास होत होता. त्यामुळे त्यांचं खाणं-पिणंही मुश्किल झालं होतं. इतकंच नाही, तर बोलतानाही त्यांना मोठा त्रास होत होता.
दरम्यान, शोच्या शेवटच्या शूटिंग दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन देखील खूप भावूक झाले होते. त्यांनी ट्विटरवरुन शोबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना अतिशय दु: ख होत असल्याचं म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय की, “शो ऑफएअर होण्याने, या पर्वातील संबंधित सर्व व्यक्ती, प्रोडक्शन आणि ब्रॉडकास्टिंग टीम, आम्ही सर्व दु:खी होतो. पण तरीही आज आम्ही सर्वांनी शोचं शूटिंग पूर्ण केलं.”
त्यांनी पुढं सांगितलंय की, “गेल्या महिन्यात केबीसीच्या शोदरम्यान सर्वात जास्त बोलल्याने, माझ्या स्वरयंत्राला (व्होकल कॉर्डस) ला इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळे मला काहीही खाताना-पिताना मोठा त्रास होत आहे. अॅन्टिबायोटिक आणि पेन किलरच्या गोळ्यामुळे मी अंतिम शोचं शूटिंग पूर्ण करु शकलो.”
दरम्यान, केबीसीच्या शोच्या जागी तीन नव्या मालिका लवकरच सुरु होणार आहेत. यात ‘पहरेदार पिया की’चा सिक्वेल ‘रिश्ते लिखेंगे हम’, जायद खानची नवी मालिका ‘हासिल’ आणि रोमँटिक-हॉरर शो ‘एक दिवाना था’ या मालिका सोनी टीव्हीवर सुरु होणार आहेत.