Bhau Kadam : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमाने जवळपास 10 वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. प्रत्येक कलाकाराच्या विनोदी शैलीने अनेकांची मनं जिंकलीत. त्याचमुळे कार्यक्रमाला सलग 10 वर्ष प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण काही महिन्यांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अगदी शेवटच्या काळात कार्यक्रमाचा टीआरपी हा पूर्ण घसरला. त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण कार्यक्रमाचा टीआरपी का घसरला? याकडे प्रेक्षकांनी पाठ का फिरवली? यावर भाऊ कदमने (Bhau Kadam) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
भाऊ कदमने नुकतच रेडीओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये भाऊ कदमने यावर भाष्य केलं आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला सुरुवातीला खूप यश मिळालं पण काही काळानंतर कार्यक्रमाचा टीआरपी घसरला. या सगळ्या गोष्टींचा काही आयुष्यावर काही परिणाम झाला? यावर भाऊ कदमने म्हटलं की, याचा आयुष्यावर काही परिणाम झाला असं नाही. पण या सगळ्याचा मी एक विचार केला.
स्क्रिप्ट एवढी वर्षे एकच माणूस लिहित आलाय - भाऊ कदम
भाऊ कदमने म्हटलं की, मी या सगळ्या गोष्टींचा एका वेगळ्या पद्धतीने विचार केलाय. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची स्क्रिप्ट इतकी वर्ष एकच माणूस लिहित आलाय. जसा आमचा कार्यक्रम तसे दुसऱ्या चॅनलवरही कॉमेडी शो सुरु होता. पण तिथे प्रत्येक स्क्रिप्टचे लेखक वेगवेगळे होते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये व्हेरिएशन्स होते. आमच्याकडे एकच माणूस लिहित असल्यामुळे त्यामध्ये किती व्हेरिएशन येणार? आता आपण केलेलं सगळंच हिट होतं असं नाही. कोणतीच प्रक्रिया अशी नसते. आपण केलेली प्रत्येक गोष्ट जशी हिट होत नाही अगदी तसंच आपलं प्रत्येक स्किट वाजेलच असं नाही. कुठेतरी अपयश ही यशाची पायरी असते. त्यामुळे खाली आल्यावरच आपण पुन्हा वर जातो, यातही एक वेगळी मजा येते.
प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला कार्यक्रम
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. डॉक्टर निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam), सागर कारंडे (Sagar Karande), श्रेया बुगडे (Shreya Bugde), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), अंकुर वाढवे हे विनोदवीर या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत. थुकटरवाडी, पोस्टमन, 'होऊ दे व्हायरल','सेलिब्रिटी पॅटर्न','लहान तोंडी मोठा घास' असे अनेक पर्व, मराठीसह बॉलिवूड सिनेमाचं प्रमोशन अशा अनेक गोष्टींची प्रेक्षकांना आता आठवण येईल.