नवी दिल्ली : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त मालिका 'पहरेदार पिया की' विरोधात ब्रॉडकास्टिंग कन्टेंट कम्प्लेंट्स काऊन्सिलने (बीसीसीसी) कारवाई केली आहे. बीसीसीसीने सोनी वाहिनीला मालिकेची वेळ बदलण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता ही मालिका रात्री 8.30 ऐवजी रात्री 10.30 वाजता दिसण्याची शक्यता आहे.


याशिवाय मालिका सुरु असताना 'ही मालिका बालविवाहाला प्रोत्साहन देत नाही', अशा आशयाची पट्टी चालवावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

https://twitter.com/PTI_News/status/897781396495663104

नुकतीच सुरु झालेली 'पहरेदार पिया की' ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. एका 18 वर्षांच्या तरुणीचं 9 वर्षांच्या मुलासोबत लग्न होतं. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमध्ये सुहागरात तसंच कुंकू लावण्याचे सीन दाखवले होते. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता.

‘पहरेदार पिया की’ मालिकेविषयी रोष निर्माण झाल्याने मानसी जैन नावाच्या एका तरुणीने change.org वेबसाईटवर याचिका दाखल केली होती. ही मालिका तातडीने बंद करा अशी मागणी या याचिकेद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर स्मृती इराणी यांनी मागणीचा विचार करत ब्रॉडकास्टिंग कन्टेंट कम्पलेंट्स काऊन्सिलकडे हे प्रकरण सोपवून बीसीसीसीला या मालिकेवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

स्मृती इराणींची 'पहरेदार पिया की'विरोधात कारवाई, मालिका बंद होणार?

या प्रकरणी बुधवारी झालेल्या बैठकीत कौन्सिलने वाहिनीला मालिकेची वेळ बदलण्याचा आदेश दिला आहे. शिवाय मालिका बालविवाहाला प्रोत्साहन देत नसल्याची पट्टी चालवण्यासही सांगितलं आहे.

साक्षी सुमीत निर्मित 'पहरेदार पिया की' ही मालिका 17 जुलै रोजी पहिल्यांदा प्रसारित झाली होती. 18 वर्षीय तेजस्वी प्रकाश मालिकेत दिया ही व्यक्तिरेखा साकारत असून अफान खान ह्या 9 वर्षांच्या मुलाने रतनची भूमिका साकारली आहे.

मालिकेत 9 वर्षांचा रतन त्याच्या दुप्पट म्हणजे 18 वर्षांच्या दियाचा पाठलाग करताना, तिच्या भांगात कुंकू भरताना दाखवण्यात आलं आहे.