Avadhoot Gupte Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
वृत्त वाहिन्यांवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या पक्षातील नेत्यांच्या मुलाखती सुरू असतात. पण मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या एका वाहिनीवर कलाकारांच्या मुलाखतींपेक्षा राजकारणी मंडळीच्या मुलाखती जास्त दाखवण्यात आल्या आहेत. 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात आतापर्यंत दोन नेते सहभागी झाले असून आगामी भागात तिसरा नेता हजेरी लावणार आहे.
'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) सहभागी झाले आहेत. तर संजय राऊत (Sanjay Raut) या मालिकेच्या आगामी भागात हजेरी लावणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे.
'खुप्ते तिथे गुप्ते' कार्यक्रमावर प्रेक्षकांची नाराजी
नेत्यांच्या मुलाखती पाहण्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'खुप्ते तिथे गुप्ते' या नावाऐवजी 'गुप्ते तिथे राजकारणी', असे या कार्यक्रमाचे नाव ठेवा. मराठी कलाकार संपलेत का? राजकारणी आहेत की कलाकार? नारायण राणे आल्यावर आता संजय राऊत येणार हे कळंल. आता देवेंद्र फडणवीस, मग उद्धव ठाकरे, त्यानंतर एकनाथ शिंदे, मग अजित पवार असा क्रम लागणार आहे, इतर चॅनल्स कमी पडले का? इथे पण राजकारण, काहीतरी वेगळं दाखवा, आता हा कार्यक्रम बंद करा, अती प्रमोशनमुळे कार्यक्रमाचा सगळा रस गेला आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या या सीझनचं शूटिंग आधीच पार पडलं आहे. खरंतर या सीझनमध्ये अनेक राजकारणी मंडळींसोबत मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांच्या मुलाखतीही दाखवण्यात येणार आहेत. आरोप प्रत्यारोपांवरील धारदार प्रश्नांना अमूक एक नेता सडेतोड उत्तर देणार असं म्हणत या नेत्यांचे प्रोमो सोशल मीडियावर आऊट करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या