Fakta Marathi Cine Sanman : गेल्या 50 वर्षांहून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमाविश्वात आपल्या सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनयानं अशोक सराफ (Ashok Saraf) या व्यक्तिमत्वानं स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण केलं आहे. अशोक मामांनी नुकतीच वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. याशिवाय त्यांनी मनोरंजन विश्वातील कारकिर्दीला देखील 50 वर्षे पूर्ण केली आहेत. आजवर आपल्या विनोदी भूमिकांमधून अशोक मामांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. अभिनयाची उत्तम जाण, विनोदाचं उत्तम अंग असलेले अशोकमामा 'बहुगुणी बहुरूपी' देखील आहेत. आता अशोक मामांचा 'फक्त मराठी सिने सन्मान' विशेष सन्मान होणार आहे.


नाटक सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात अशोक सराफ यांची कामगिरी अतुलनीय असून त्यांचा चाहता वर्ग हा फार मोठा आहे. त्यांच्या या गौरवशाली कारकिर्दीला नुकताच पार पडलेल्या 'फक्त मराठी सिने सन्मान'मध्ये विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे. तर हा सन्मान त्यांचे गेली अनेक वर्षे मित्र असलेले सचिन पिळगावकर आणि त्यांच्या कुटुंबाच्या हस्ते करण्यात आला. या दरम्यान मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. 


विद्या बालन मराठमोळ्या छाया कदमच्या प्रेमात 


'फक्त मराठी सिने सन्मान 2022' या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडची महानायिका 'विद्या बालन' यांनी हजेरी लावली. आपल्या दमदार अभिनयाने संपूर्ण देशाला आपल्या प्रेमात पाडणारी ही अभिनेत्री मात्र एका मराठमोळ्या अभिनेत्रींच्या प्रेमात आहे. फक्त मराठी सिने सन्मान सोहळ्या दरम्यान विद्या बालन यांनी अभिनेत्री छाया कदम यांना भेटून तिच्या अभिनयाचे कौतुक केले. सोहळ्यात रेड कार्पेटवर फोटो काढण्यासाठी येत असताना विद्या बालन यांनी अभिनेत्री छाया कदम यांना पाहिलं. फोटो साठी न जाता छाया कदम यांच्या समोर उभ राहत विद्या बालनने त्यांना थांबून 'गंगुबाई' आणि 'झुंड' या सिनेमातील तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडल्याचे कबुल केलं. तर या सिने सन्मानच्या निमित्ताने भेटलेल्या या दोन हरहुन्नरी अभिनेत्रींचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


धर्मवीर, चंद्रमुखी, सोयरीक, लोच्या झाला रे, पांघरूण अशा अनेक चित्रपटांना या सिने सन्मान सोहळ्यात नामांकन प्राप्त झाले आहे. तर सूत्र संचालकांची नवीन जोडी या सिने सन्मान मराठी पुरस्कार सोहळ्याने दिली ती म्हणजे अमेय वाघ आणि ओंकार भोजने. या दोघांच्या तुफान विनोदी षटकारांनी फक्त मराठी सिने सन्मान उजळून निघाला.