'माझ्या मते भारतात गांजाला कायदेशीर परवानगी देण्यात यावी. एकतर हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर गांजावर कर आकारल्यास त्यातून महसुली उत्पन्न मिळू शकतं. सोबतच गांजाशी निगडीत गुन्हेगारी बाजू वजा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांजाचे वैद्यकीय फायदेही आहेत' या आशयाचं ट्वीट उदय चोप्राने केलं.
उदय चोप्राचं ट्वीट पाहून मुंबई पोलिसांनी त्याला चांगलंच सुनावलं. 'भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला जाहीर मंचावर आपलं मत व्यक्त करण्याचे अधिकार आहेत. पण सजग राहा. सध्यातरी गांजा पिणं, बाळगणं आणि त्याची वाहतूक करणं याला नार्कोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉफिक सब्सटन्स कायद्याअंतर्गत गंभीर शिक्षा आहे. याविषयी माहिती पसरवा' असं मुंबई पोलिसांनी उदयचं ट्वीट कोट करुन लिहिलं आहे.
विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या ट्वीटनंतर उदयने पुन्हा एकदा ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी (गांजा) वापरत नाही. पण हा शहाणपणाचा निर्णय असं मला वाटतं. आपला इतिहास पाहता मी हे म्हटलं' असं उदयने लिहिलं.
यापूर्वी कर्नाटक निवडणुकांच्या निकालांबाबत टिप्पणी करणाऱ्या ट्वीटमुळे अभिनेता उदय चोप्राच ट्रोल झाला होता. भाजपच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींवरुन उदय चोप्राने राज्यपाल वजूभाई वाला यांच्याविषयी ट्वीट केलं होतं.
उदय चोप्राने मोहब्बते, धूम, मेरे यार की शादी है, नील एन निक्की यासारख्या 'यशराज फिल्म्स'च्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. यश चोप्रा यांचा सुपुत्र, प्रख्यात दिग्दर्शक आदित्य चोप्राचा धाकटा भाऊ आणि राणी मुखर्जीचा दीर असूनही उदय फारशी चमक दाखवू शकला नाही. 2013 मध्ये प्रदर्शित 'धूम 3'नंतर तो मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही.