कोलकाता : प्रो कबड्डीची अँकर, मॉडेल, अभिनेत्री सोनिका चौहानचा कार अपघातात मृत्यू झाला. कोलकात्यात पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात सोनिकाला प्राण गमवावे लागले, तर तिच्यासोबत कारमध्ये असलेला अभिनेता विक्रम चॅटर्जी जखमी झाला आहे.


बंगाली अभिनेता विक्रमसोबत सोनिका प्रवास करत होती. त्यावेळी विक्रमचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण कोलकात्यातील रासबिहारी अव्हेन्यूमधील लेक मॉलजवळ हा अपघात घडला. नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवरील स्टॉल्सना धडकली.



अपघातानंतर पादचाऱ्यांनी सोनिका आणि विक्रम यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढलं. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी सोनिकाला मृत घोषित केलं.

विक्रमला प्रथमोपचारांनंतर सोडून देण्यात आलं होतं, मात्र पुन्हा त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनिकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.



घटनास्थळावरील उपस्थितांच्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी विक्रम कार चालवत होता. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून वेगाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याने अपघात घडला का, याचा शोध घेत आहेत.