मुंबई : धार्मिल भावना भडकावल्याप्रकरणी अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे. एजाज हा बिग बॉस या रिअलिटी शोमध्ये स्पर्धक होता.


टिक टॉक अॅपवर 07 या ग्रुपने तबरेज अन्सारी मॉब लिंचिंग घटनेवरुन एक वादग्रस्त व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या आरोपी तरुणांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून एजाजने त्यांचे समर्थन केले, तसेच त्यांच्यासोबत अनेक टिक टॉक व्हिडीओ बनवले.

आरोपी फैजू आणि त्याच्या इतर साथीदारांसह मिळून एजाजने धार्मिक भावना दुखावणारे अनेक व्हिडीओ बनवले. दोन धर्मांमध्ये, सामुदायांमध्ये मोठा वाद निर्माण करणारे व्हिडीओ एजाज आणि फैजूने बनवले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुरुवारी एजाज खानला अटक केली आहे.

एजाजवर आयपीसीच्या कलम 153 (अ), 34 आणि आयटी अॅक्ट 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. एजाज नेहमीच वादग्रस्त विधानं करुन माध्यमांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो.

व्हिडीओ पाहा



गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबई पोलिसांनी एजाजला 2.2 लाख रुपयांच्या ड्रग्ससह पकडले होते. त्यावेळी त्याला जेलची हवा खावी लागली होती.