Hemangi Kavi : हेमांगी कवी (Hemangi Kavi) तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी हेमांगीने सोशल मीडियावर लिहिलेली 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट चांगचील व्हायरल झाली होती. ती पोस्ट काही व्यक्तींना खटकली होती. तर काही व्यक्तींनी हेमांगीचे कौतुक केले होते. स्त्रियांनी ब्रा घालावी का? यासंदर्भातली ती पोस्ट होती. त्यानंतर हेमांगी आता पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. 




हेमांगीने दसऱ्याला नेसलेल्या साडीवर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे तिचे काही चाहते तिला सुनावत आहेत. हेमांगीचे चाहते कमेंट्स करत लिहित आहेत,"खूप सुंदर दिसतेस. साधेपणातलं तुझं सौंदर्य छानच. तुझे विचारदेखील छान आहेत. थोडसं खटकलं-मराठमोळ्या पेहरावात पदर नीट घेतला असतास तर अजून छान दिसलं असतं". त्या कमेंटवर हेमांगी प्रतिउत्तर देत म्हणाली,"धन्यवाद. पदर नीट घेतला असता म्हणजे? हे एक बाईच कसं बोलू शकते? याचं नवल वाटतं मला..ते देखील तुमच्या सारख्या स्लीव्हलेस घातलेल्या बाईकडून यावं? मराठमोळ्या संस्कृतीत साडीवर स्लीव्हलेस ब्लाउज कधी होता जरा सांगता का? माझं अज्ञान तेवढचं दूर होईल".    


Hemangi Kavi : बेधडक हेमांगीवर कौतुकाचा वर्षाव, 'बाई, बुब्स आणि ब्रा' पोस्टच्या माध्यमातून मांडलं वास्तव


हेमांगीच्या त्या उत्तरावर तिचे चाहते म्हणाले,"नऊवारी साडी, नथ, खणाचं ब्लाऊज हे सगळं मराठमोळ्या पेहरावाचं प्रतिक आहे. तुझ्याच मागे लिहिलेल्या लेखाचं मी माझ्या वर्तुळात जोरदार समर्थन केलं होतं. त्यावेळी ते पटलं म्हणून समर्थन केलं. आता हे खटकलं म्हणून व्यक्त केलं. मी नेसलेली साडी आणि त्यावरील स्लीव्हलेस ब्लाउज हा कुठल्याच पद्धतीने पारंपारिक पेहराव नाही. आधुनिक साडी असाच पेहराव आहे. जसं मी तुझ्या चांगल्या गोष्टींबद्दल लिहिलं तसच एखादी गोष्ट न आवडलेलीदेखील असू शकते. एखाद्यावेळी तुझी एखादी गोष्ट नाही आवडली तर खिलाडू वृत्तीने घे. तुला दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही".




चाहत्यांना सडेतोड उत्तर देत हेमांगी म्हणाली, आपण बायकाच जिकडे लक्ष जाणार नाही किंवा लोकांच्या लक्षातदेखील येणार नाही अशा गोष्टी का अधोरेखित करतो? समजा लक्ष गेलंच तर तो त्यांच्या बघण्याचा दृष्टीकोन असू शकतो. आपण आपण कितीही झाकून ठेवलं तरी ज्याला बघायचं आहे आणि विचार करायचा आहे तो करतोच. पण मी जर तुमच्या डीपी वर कमेंट केली असती. ब्लाउज जरा नीट असता तर बरं झालं असतं. मग काय वाटलं असतं तुम्हाला? माझं सगळच छान आहे आणि लोकांनी देखील छानचं म्हणावं असा माझा अजिबात हट्ट नाही. पण नको त्या गोष्टींना केंद्रीत करणं किती योग्य आहे. हे सगळं चूक बरोबरच्या नादात आपण आपल्यावरच किती अन्याय करुन घेत आहोत ते बायकांना लक्षातच येत नाही. याचाच फायदा पुरुष घेतात. 


हेमांगी कवीने नववारी साडी नेसली होती. त्यावर तिने रेशमी खणाचा कॉलेजमध्ये असताना शिवलेला ब्लाउज घातला होता. त्या ब्लाउजचे कापड तिने तिच्या गावावरुन आणलेले होते. "आता असे रेशमी खण क्वचितच मिळतात. वीस वर्षांपूर्वीचा ब्लाउज अजूनही व्यवस्थित बसतो. याचा एक वेगळाच आनंद असतो. हो की नाही?"अशी कॅप्शन हेमांगीने फोटोखाली दिलेली आहे".