मुंबई : गळ्यात कोब्रा घातलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री श्रुती उल्फतची जामीनावर सुटका झाली आहे. मुंबईतील बोरीवली कोर्टाकडून 5000 रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झाला आहे.

कोब्रा गळ्यात घालून काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री श्रुती उल्फतला आजच अटक करण्यात आली होती. वन विभागाने भारतीय वनजीव संरक्षण कायदा 9, 48, 49 या कलमानुसार कारवाई केली.

श्रुती उल्फत, विपिन पुरी यांच्यासह नितिन सोलंकी आणि उत्कर्ष बाली या दोन प्रॉडक्शन मॅनेजरना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु जामीन मंजूर झाल्याने श्रुतीची सुटका झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी छोट्या पडद्यावर 'नागार्जुन.. एक योद्धा' ही मालिका 'लाईफ ओके' वाहिनीवर गाजली होती. या मालिकेत भूमिका करणाऱ्या अभिनेत्री श्रुती उल्फतने गळ्यात नाग घालून दोन व्हिडिओ 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केले होते. हा व्हिडिओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला होता. श्रुतीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

श्रुती उल्फतने अभिनय केलेले राझ, ऐतबार यासारखे चित्रपट गाजले होते. त्याचप्रमाणे चलती का नाम अंताक्षरी हा टीव्ही शो आणि आय लव्ह यू, ससुराल गेंदा फूल, जमाई राजा, नागार्जुन.. एक योद्धा, गुस्ताख दिल यासारख्या मालिकांमध्येही ती झळकली होती.

हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी टीका सुरु झाली होती. त्यानंतर श्रुतीसह चार जणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली या चौघांना अटक झाली आहे. यामध्ये मालिकेतील आणखी एका अभिनेत्री आणि प्रोडक्शनमधील दोन व्यवस्थापकांचा समावेश आहे.

काही पशुप्रेमींच्या तक्रारीनंतर मुंबई प्रादेशिक विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला, नागाच्या चित्रणाचा व्हिडिओ स्पेशल इफेक्ट्सचा वापर करुन तयार केल्याचा दावा प्रॉडक्शन टीमने केला होता. त्यामध्ये कोणत्याही जिवंत अथवा मृत सापाचा समावेश नसल्याचं प्रॉडक्शन टीमने म्हटलं होतं.

त्यानंतर वन विभागाने सोशल मीडियावरील व्हिडिओ डाऊनलोड करुन मुंबईच्या कलिनामधील फॉरेंसिक लॅबला परीक्षणासाठी पाठवला होता. 17 जानेवारी रोजी त्याचा रिपोर्ट मिळाल्यावर त्या व्हिडिओत जिवंत साप वापरल्याचं दिसून आले. त्यानंतर चौघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

https://twitter.com/singhvirat246/status/829387777846497281

https://twitter.com/singhvirat246/status/829386928696987648