Marathi Serial Sunil Barve :  अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) हे तब्बल 11 वर्षानंतर 'झी मराठी'वर (Zee Marathi) कमबॅक करत आहेत.  सुनील बर्वे यांनी झी मराठीवरील 'कुंकू' मालिकेत नरसिंहराव यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर सुनील बर्वे हे पारू मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत सुनील बर्वे हे सयाजीराव ही भूमिका साकारणार आहे. 


मागील काही दिवसांपासून 'पारू' मालिकेच्या कथानकात वेगवेगळे बदल घडत आहेत. आता मालिकेत अहिल्यादेवींच्या भावाची म्हणजेच सयाजीरावची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून अभिनेते सुनील बर्वे 'झी मराठी'वर 11 वर्षांनंतर पुन्हा कमबॅक करत आहेत. राखी पौर्णिमेच्या दिवशी सुनील बर्वे यांची मालिकेत एन्ट्री झाली. त्यानंतर आता त्यांची महत्त्वाची भूमिका असलेले एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


सुनील बर्वे यांनी 'झी मराठी' सोबत काम करण्याबाबत सांगितले की, "झी मराठीवर काम करण्याची उत्सुकता नेहमीच होती. झी मराठी मालिका विश्वातला पायनियर आहे आणि मी झी मराठी बरोबर एकदिलाने 2012 पर्यंत काम केलंय. त्यामुळे एक आत्मीयता आहे. जेव्हा पासून प्रायव्हेट चॅनेलची सुरुवात झाली तेव्हा पासून झी मराठीने अनेक कलाकारांच्या  करियरला आकार देण्यास मदत केली आहे. तेव्हा पुन्हा झी मराठी सोबत काम करण्याची उत्सुकता वेगळीच असल्याचे सुनील बर्वे यांनी सांगितले.


सयाजीरावच्या व्यक्तीरेखेबाबत बोलताना सुनील बर्वे यांनी सांगितले की,  सयाजीरावला पाहून अनेकांना नरसिंहरावची आठवण झाली. प्रेक्षकांना अजूनही माझी 11 वर्षापूर्वीची 'कुंकू' मालिका लक्षात आहे . मला खूप आनंद झाला की लोकांच्या हृदयात ती मालिका आणि माझी भूमिका अजून ही ताजी आहे, अशी कृतज्ञ भावना सुनील बर्वे यांनी व्यक्त केली. 


सुनील बर्वे यांनी सांगितले की, मला जेव्हा 'पारू' मालिकेसाठी कॉल आला भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा काही तरी नवीन करायला मिळणार आहे याचा आनंद झाला. प्रेक्षकांना मला स्क्रीनवर पाहिल्यावर नरसिंहची आठवण आली असेल पण सयाजीराव, खूप वेगळा आहे. सयाजीराव जरी गावचा कर्ताधर्ता असला तरी, एक माणूस म्हणून नरम स्वभावाचा आहे आणि तोच वेगळेपणा मला या भूमिकेसाठी ऊर्जा देत आहे, असे त्यांनी सांगितले.





पुढे त्यांनी सांगितले की, सयाजीराव आपल्या तत्वांशी बांधलेला आहे,  कुटुंबावरचं आणि त्याच्या बहिणीवरचं  प्रेम तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. एकदम छान व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. पण त्याच्या मनात जर कोणाविषयी राग असेल तर तो व्यक्त ही होतो आणि त्या व्यक्ती पासून दूरही  राहतो, असेही त्यांनी म्हटले. पारू' मालिकेत एका नवीन टीम सोबत, नवीन भूमिकेत काम करण्यासाठी आणि तुम्हा सर्वाना भेटण्यासाठी उत्सुक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.