मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित मालिका लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 'स्टार प्रवाह'वर सुरु होणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत अभिनेता सागर देशमुख आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण आणि राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचं कार्य आजही तितकंच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरतं. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहचवण्याच्या हेतूने 'स्टार प्रवाह'ने या मालिकेची निर्मिती केली आहे.

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरने 'भाई : व्यक्ती की वल्ली' या चित्रपटात साकारलेली पुलं देशपांडे यांची भूमिका चांगलीच गाजली होती. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही नवी मालिका 15 एप्रिलपासून रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचं कर्तृत्व खरंच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने आंबेडकर उलगडत आहेत. एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होत आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.' अशा भावना सागर देशमुखने व्यक्त केल्या.