मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना पुन्हा एकदा टीव्हीवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेत रमेश देव यांची एण्ट्री झाली आहे. सदानंद कुलकर्णी ही व्यक्तिरेखा ते साकारत आहेत.


सदानंद कुलकर्णींना बिजनेस जगतात वेगळी ओळख आहे. पुण्यात ते नीलम या नातीसोबत रहातात. गायकवाड कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अरुंधती म्हणजे विक्रमच्या आईला ते मुलीप्रमाणे मानायचे.

छत्रीवाली मालिकेत अभिनेता संकेत पाठक विक्रम गायकवाडच्या, तर नम्रता प्रधान मधुराच्या मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ज्योती चांदेकर, आशा शेलार, अशोक शिंदे यासारखे कलाकार या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.



अरुंधतीचा नवरा म्हणून सूर्यकांत यांची सदानंदरावांशी ओळख झाली. सूर्यकांतसाठी सदानंद म्हणजे आदर्श ठरले आणि ते त्यांना बिझनेस गुरु मानु लागले. आजारपणात विक्रमची आई म्हणजेच अरुंधतीने जगाचा निरोप घेतला. सदानंद यांची नात नीलमचं विक्रमशी लग्न व्हावं, ही तिची अंतिम इच्छा होती. अरुंधतीची हीच इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने सदानंद यांची मालिकेत एण्ट्री झाली आहे.

रमेश देव यांनी प्यार के दो नाम एक राधा एक श्याम, डोली सजा के यासारख्या काही हिंदी मालिकांमध्ये काही वर्षांपूर्वी अभिनय केला होता. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकीर्द चांगलीच गाजलेली आहे.

विक्रम-मधुरा यांचं नातं निर्णायक वळणावर असतानाच आता सदानंद यांच्या एण्ट्रीने ही गुंतागुंत आणखी वाढणार आहे. एकीकडे मधुरावरचं प्रेम तर दुसरीकडे आईची अंतिम इच्छा हा गुंता विक्रम कसा सोडवणार? याची उत्कंठा 'छत्रीवाली'च्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.