मुंबई : 'चला हवा येऊ द्या' फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांचा चोरी गेलेला मोबाईल महिन्याभराने सापडला आहे. मुंबई पोलिसांनी हा फोन भारत गणेशपुरे यांना सोपवला आहे. महिन्याभरापूर्वी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भारत गणेशपुरे यांचा फोन त्यांच्या कारमधून चोरट्यांनी लांबवला होता. मुंबई पोलिसांनी झोन ​​12 च्या हद्दीत भारत गणेशपुरे यांच्यासह 312 जणांचा मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे.


4 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या पावसाचा फटका सर्वसामान्यांसह 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता भारत गणेशपुरे यांनाही बसला. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर त्यांना वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. वाहतूक कोंडी झाली असताना एका टोळक्याने भारत गणेशपुरे यांचा मोबाईल फोन चक्क गाडीतून चोरला. स्वत: भारत गणेशपुरे यांनी हा अनुभव फेसबुकवर शेअर केला होता. माझ्या चुकीमुळे मोबाईल चोरीला गेला असं सांगत मदतीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीपासून सावध राहा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.


पाऊस होता, ट्रॅफिक होतं, त्याचवेळी माझा मोबाईल गाडीतून लुटून नेला; भारत गणेशपुरे यांचा थरारक अनुभव


तीन दिवसांपूर्वी मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळला. परिणामी वाहतूक बंद करण्यात आली. मात्र रस्त्यावर आधीपासूनच असलेल्या गाड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याचाच फायदा घेत काही चोरांनी मदतीच्या बहाण्याने भारत गणेशपुरे यांच्या मोबाईल फोनवर डल्ला मारला. त्यानंतर भरत गणेशपुरे यांनी मोबाईल चोरल्याची तक्रार समतानगर पोलीस ठाण्यात दिली होती.



या मोबाईल चोरांना पकडण्यासाठी सर्कल 12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरीचा मोबाईल शोधण्यासाठी आणि चोरट्यांसह मोबाईल जप्त करण्यासाठी एक विशेष पथक तयार केलं होतं. पोलिसांच्या पथकाने कारवाई करत मोबाईल चोरांना अटक करुन त्यांच्याकडून मोबाईल ताब्यात घेतले. पोलिसांनी भारत गणेशपुरे यांच्यासह 312 जणांचे चोरीला गेलेले मोबाईल फोन परत केले आहेत.