मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तिच्या सोशल मिडीया इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका रडतानाच्या व्हिडीओमुळे मोठा गोंधळ उडाला होता. या व्हिडीओमध्ये तनुश्री दत्ता हिने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा तिच्या स्वतःच्या घरामध्ये छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. तसेच घरात तिला मानसिक शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे, आणि या व्हिडीओबाबत बोलताना तिने थेट याबद्दल अभिनेते नाना पाटेकर यांना जबाबदार धरलं आहे. दरम्यान तिने पुन्हा केलेल्या गंभीर दाव्यांमुळे सर्वजण हादरले मात्र, आता त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याचा घटनाक्रम आता समोर आला आहे.

तनुश्री दत्तासोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं? घटनाक्रम 

अभिनेत्री तनुश्री दत्ताने परवा मंगळवारी (ता, 22) संध्याकाळी ऑनलाईन दोन पार्सल ऑर्डर केली होती. परवा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दोन्ही पार्सलवाले आले होते. इमारतीच्या सिक्युरिटी गार्डने एका पार्सल वाल्याची एन्ट्री करून तर दुसरा पार्सलवाल्याची विना एन्ट्री करून तनुश्री दत्ताच्या घरी पाठवले, दुसऱ्या पार्सलवाल्याची एन्ट्री नं करता सिक्युरिटी गार्डन थेट घरी पाठवल्यामुळे तनुश्री दत्ता आक्रमक झाली, तिने शंभर नंबरवर कॉल केला, ओशिवरा पोलिसांची बीट मार्शल टीम तनुश्री दत्ताला मदत करण्यासाठी घरी गेली, यावेळी बीट मार्शल सोबत तिने पार्सलवाला माझा घरी डायरेक्ट आला त्यामुळे त्याच्याकडून मला धोका आहे, सोबत इमारतीमध्ये मांजर आणि कुत्रा देखील त्रास देत असल्याचे तक्रार केली, पोलिसांनी तनुश्री दत्ताला ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या संदर्भात तक्रार करण्याची विनंती केली, मात्र तनुश्री दत्ताने मी विचार करून नंतर तक्रार करेन असं बीट मार्शलला सांगितलं, यानंतर ओशिवरा पोलिसांनी तनुश्री दत्ताला संपर्क साधला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुश्री दत्ताचा आरोप बोगस आहे. तनुश्री दत्ताचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती आहे. यापुढे तनुश्री दत्ता स्वतःहून तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आल्यावरच पोलीस तक्रार नोंद करतील, अशी माहिती देखील समोर आली आहे.

तिच्या सोशल मिडीयावरील व्हिडीओत काय?

तनुश्री दत्ताचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 2018 च्या Me Too चळवळीदरम्यान आवाज उठवल्यापासून तिला खूप त्रास दिला जात असल्याचं तनुश्रीनं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. कंटाळून तिनं पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याबाबत सांगितलं आणि मदतीची मागणी केली. 

तनुश्री दत्तानं तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री ढसाढसा रडताना दिसतेय. व्हिडीओमध्ये ती म्हणते की, "मित्रांनो, माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. मी नुकताच पोलिसांना फोन केलाय, मी निराशेतून पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले. त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलंय, जेणेकरून मी योग्यरित्या तक्रार दाखल करू शकेन. कदाचित मी उद्या तिथे जाईन कारण माझी तब्येत ठीक नाही." 

तनुश्री दत्तानं व्हिडीओमध्ये पुढे म्हटलंय की, "मला एवढा त्रास देण्यात आलाय, गेल्या 4-5 वर्षांत की, माझी तब्येत बिघडली आहे. मी काहीच काम करू शकत नाहीये, माझं संपूर्ण कुटुंब बरबाद झालंय, मी हाऊस हेल्परही ठेवू शकत नाही... त्या लोकांनी माझ्या घरात एक हाऊस हेल्पर ठेवलेली, तिच्यामुळे मला अत्यंत वाईट अनुभव आलाय. यायचं आणि चोरी करुन निघून जायचं... मला सर्व कामं स्वतःच करावी लागतायत... मी माझ्याच घरात खूपच अडचणींमध्ये सापडली आहे... प्लीज कुणीतरी माझी मदत करा..."