Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: तब्बल 5 दशकं मराठी सिनेसृष्टीवर (Marathi Industry) आणि मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व म्हणजे, अशोक सराफ (Ashok Saraf). अगदी अचूक टायमिंग आणि आपल्या हावभावांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं अशोक मामांकडचं कसब प्रेक्षकांना आपलंस वाटतं. अशोक सराफांनी अनेक मराठी नाटकं, सिनेमे केले. त्यासोबतच काही हिंदी आणि मराठी मालिकांमधूनही अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ऐंशी आणि नव्वदचं दशक तर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर या चौकटीनं हादरवून सोडलेलं. अनेक दर्जेदार मराठी सिनेमे करुन या दिग्गजांनी मराठी माणसाच्या मनात हक्काची जागा मिळवली. या चौकटीतली अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या जोडीसोबतच आणखी एक सुपरहिट जोडी होती. ती म्हणजे, अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकरांची (Sachin Pilgaonkar).
अगदी बालपणापासूनच सिनेसृष्टीत सक्रिय असलेले दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांची मैत्री तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या जोडगोळीचे अनेक सिनेमे मराठी इंडस्ट्रीत सुपरहिट ठरले. याबाबत अशोक सराफ यांनी नुकत्याच मुलाखतीत भाष्य केलं आहे. मुलाखतीत बोलताना सचिन माझा आधी कधीच मित्र नव्हता, असं वक्तव्य अशोक सराफ यांनी केलं आहे. तसेच, पुढे बोलताना त्यांनी त्याचं कारणंही सांगितलं आहे.
अशोक सराफ नेमकं काय म्हणाले?
रेडियो नशाला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी सचिन पिळगावकर आणि त्यांच्या मैत्रीबाबत वक्तव्य केलं आहे. अशोक सराफ म्हणाले की, "मायबाप सिनेमापासून आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. हा सिनेमा सचिनने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. त्यावेळी मी आणि सचिननं पहिल्यांदा एकत्र काम केलं. सचिनने तब्बल 15 मराठी सिनेमे बनवले. त्या सर्व पिक्चरमध्ये मी आहे. सचिनसोबत माझी आधी कधीच मैत्री नव्हती. त्याच्या वडिलांसोबत माझी मैत्री होती. सचिनचे वडील शरद पिळगावकर हे निर्माते होते. शरदजींनी जे सिनेमे बनवले त्यातही मी काम केलं. त्यामुळे मी शरदजींचा मित्र होतो."
"मी ऑफिसला कधी शरदजींना भेटायला जायचो, तेव्हा सचिन तिकडे यायचा. काय? कसाय? बरा आहे ना, एवढंच आमचं बोलणं व्हायचं. बाकी आम्ही काही बोलायचो नाही. तो मग निघून जायचा मी पण माझ्या कामाला जायचो. पण जेव्हा एकत्र काम करायला लागतो तेव्हा माझं आणि त्यांचं खूप जमलं. त्याची जी इच्छा आहे ते मला अभिनयातून कसं द्यायचंय आणि मी जे करु शकतो ते त्याला बघायचंय, ही गोष्ट आमची छान जुळली. त्यामुळे आम्ही इतके चांगले मित्र बनलो की, विचारुच नका. आम्ही सलग सिनेमे केले. आणि मराठी सिनेमात त्याने बॅक टू बॅक हिट सिनेमे दिले.", असं अशोक सराफ म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :