ठाणे : जवळपास पाच महिन्यांपासून सिनेमागृहं बंद आहेत. कोरोनाची चाहूल लागल्यानंतर सगळ्यात आधी कुलुपं लागली ती सिनेमा आणि नाटकांच्या थिएटर्सना. त्यावेळी लॉकडाऊन होणार की नाही.. झाला तर किती होणार याची काहीच कल्पना थिएटरवाल्यांना नव्हती. पण काळाची गरज ओळखून सरकारने घेतलेल्या निर्णयाला राज्यातल्या सर्वच सिनेमागृहांनी सकारात्मक प्रतिसाद देत थिएटर बंद केली.


थिएटर बंद करूनही आता पाच महिने उलटले. लॉकडाऊन लागून आता देश, राज्य पातळीवर अनलॉक करण्याचे निर्णय घेतले जाऊ लागले. हॉटेलं सुरू झाली. दुकानं सुरू झाली. आता तर खासगी कार्यालयं सुरू झाली. अनेक गोष्टींना परवानगी मिळाली आहे. पण आरोग्याची काळजी म्हणून सिनेमागृहं मात्र अद्याप बंदच ठेवण्याचा निर्णय झाला. याच निर्णयाचा पुनर्विचार करून थिएटर्स उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी झाली ती ठाण्यामध्ये. ठाण्यात वंदना टॉकिजच्या परिसरात ठाण्यातल्या एक पडदा चित्रपटगृहांचे चालक-मालक एकत्र आले होते. त्या सर्वांनी प्रतिकात्मक आंदोलन केलं.


थायलंडच्या 'त्या' ट्रिपचा 'सारा' खेळ सुशांतचाच!


अत्यंत शांततेत करण्यात आलेल्या या आंदोलनात ठाण्यात असलेल्या मल्हार, गणेश, प्रभात गोल्ड, आनंद आणि वंदना या एक पडदा चित्रपटगृहांचे चालक-मालक सहभागी झाले होते. यावेळी सिनेमाच्या पोस्टरचा बाज ठेवून थिएटर उघडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना वंदना थिएटरचे चालक आणि दिग्दर्शक विजू माने म्हणाले, 'आता थिएटर्स सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. थिएटर्सही सुरू व्हायला हरकत नाही. कोरोनासंबंधी घ्यायची काळजी आम्ही घेऊच. पण सर्वच थिएटर्सनी पाच महिने तग धरला आहे. आता हळूहळू थिएटर्स सुरू व्हायला हवीत. आत्ता आम्ही प्रतिकात्मक पद्धतीने आंदोलन केलं आहे. कायदा हातात न घेता शांततेत हे आंदोलन झालं. या मागणीची दखल सरकारने घ्यावी. ती जर घेतली गेली नाही तर मात्र पुढचं आंदोलन आम्ही आणखी जोरात करू. त्यावेळी जर कायदा मोडला तर मात्र ती आमची जबाबदारी नसेल. '


गेल्या पाच महिन्यांपासून सिंगल स्क्रीन बंद असल्याने थिएटरवाल्यांचं मोठं नुकसान होतं आहे. यासंबंधी थिएटर मालक संघटनेचे नितीन दातार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना एक निवेदनही काही दिवसांपूर्वी दिलं आहे. आत्ता परवानगी दिली तर हळूहळू लोक थिएटरमध्ये यायला लागतील. त्यांच्यातही एक विश्वास निर्माण होईल. हळूहळू सिनेमे रिलीज होऊ लागतील. सगळंच जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. तर थिएटरवाल्यांना वेगळा नियम का असंही बोललं जात आहे. विशेष बाब अशी की मल्टिप्लेक्स थिएटर्सच्या कंपन्यांनी मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मल्टिप्लेक्स थिएटर्सनी याबद्दल आपल्या मागण्या केंद्राकडे केल्या आहेतच. लॉकडाऊननंतर थिएटरचं न्यू नॉर्मल कसं असेल हेही सांगितलं आहे. पण त्यानंतरही सरकारने परवानगी नाकारल्यानंतर मोठी थिएटर्स मात्र शांत आहेत.


रणबीर कपूर,रणवीस सिंह,अयान मुखर्जी यांची ड्रग्ज टेस्ट करा; कंगनाचं बॉलिवूडच्या स्टार्सना थेट आव्हान