Jignesh Mevani Arrest : काँग्रेस आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. जिग्नेश यांना गुजरातमधील पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने आपला निषेध नोंदवला आहे. अभिनेत्रीने ट्विटरवर #FreeJigneshMevani म्हणत ट्विट केले आहे.


जिग्नेश गुजरातच्या वडगाम विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आसाममधील एका प्रकरणात जिग्नेश मेवाणी यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी प्रथम जिग्नेश मेवाणी यांना अहमदाबादला नेले आहे.


काय म्हणाली स्वरा भास्कर?


बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत म्हंटले की, ‘जिग्नेश मेवाणीच्या मित्राकडून नुकताच असा मेसेज मिळाला की, जिग्नेशला आत्ताच आसाम पोलिसांनी पालमपूर सर्किट हाऊसमधून अटक केली आहे. त्याचे फोन देखील काढून घेण्यात आले आहेत. एफआयआरची प्रत देखील कोणाकडे नाही.. हे काय चालले आहे? जिग्नेश मेवाणीला का अटक केली? #FreeJigneshMevani RT करा आणि शेअर करा’.



एबीपी न्यूज नुसार, बुधवारी रात्री पालनपूर सर्किट हाऊस येथून जिग्नेश मेवाणी यांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मेवाणीच्या टीमशी संबंधित एका कार्यकर्त्याने सांगितले की, पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत शेअर केलेली नाही. आसाममध्ये त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे.



का झाली अटक?


या अटकेसंदर्भात बोलताना जिग्नेश मेवाणी म्हणाले की, माझ्या एका ट्विटच्या संदर्भात मला अटक करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी मला कोणतीही अचूक माहिती दिली नाही. मी कोणत्याही खोट्या तक्रारीला घाबरत नाही, मी माझा लढा सुरूच ठेवणार असल्याचे मेवाणी म्हणाले.


संबंधित बातम्या