TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


नेटफ्लिक्सला मोठा झटका


चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मचा वापर करतात. पण  नेटफ्लिक्स  या कंपनीचं गेल्या तीन महिन्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. रिपोर्टनुसार नेटफ्लिक्सचे लाखो  सब्सक्रायबर्स घटले आहेत. जवळपास 100 दिवसांमध्ये नेटफ्लिक्सचे दोन लाखपेक्षा जास्त सब्सक्रायबर्स कमी झाले आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तीन महिन्यांमध्ये नेटफ्लिक्स युझरची संख्या 221.6 मिलियन झाली आहे. 


'गंगूबाई काठियावाडी' पाहता येणार नेटफ्लिक्सवर


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली होती. आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातल्यानंतर गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


रोहित शेट्टीचे ओटीटीवर पदार्पण


निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीने ओटीटीवर पदार्पण केले आहे. रोहित शेट्टीने त्याच्या आगामी वेब सीरिजची घोषणा केली आहे. 'इंडियन पुलिस फोर्स' असे त्याच्या आगामी वेब सीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 


ज्येष्ठ दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन


प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक तेलुगू आणि हिंदी चित्रपटांची दिग्दर्शन टी रामा राव यांनी केले. 1979 मध्ये टी रामा राव यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.


रानू मंडलचं बंगाली गाण्यात पदार्पण


गानसम्राज्ञी लता मंगेशर यांचे 'एक प्यार का नगमा है' हे सुपरहिट गाणे गाऊन रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेली रानू मंडल सोशल मीडियावर अनेक कारणांनी चर्चेत राहते. आजकाल ती सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड होत असलेली गाणी गाताना दिसते. नुकताच रानू मंडलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रानू बांग्लादेशी सुपरस्टार आलोमबरोबर गाणं गाताना दिसत आहे. 


केएल राहुल आणि अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात


आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. दरम्यान बॉलिवूडची आणखी एक जोडी सात फेरे घेणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 


लता दीदींच्या आठवणीत आशा भोसले झाल्या भावूक


गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी  6 फेब्रुवारी रोजी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींची बहीण आशा भोसले आजही त्यांच्या आठवणीत भावूक होतात. नुकतीच डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर या शोमध्ये आशा भोसले यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये त्या लता दीदींच्या आठवणीत भावूक झालेल्या दिसून आल्या.


'पुष्पा'चा असाही मोठेपणा


दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे जगभरात चाहते आहेत. अल्लू अर्जुनच्या  'पुष्पा: द राइज' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुन चर्चेत आला आहे. सध्या अल्लू अर्जुन तंबाखूच्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. त्याने तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. अल्लू अर्जुनने पैशाचा विचार न करता जनतेच्या हिताचा विचार केला आहे.


मालिकेसाठी उर्मिला कोठारेनं स्वीकारलं नवं आव्हान


अभिनेत्री उर्मिला कोठारेला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. अत्यंत हालाखिच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणारी आई उर्मिला या मालिकेत साकारते आहे. त्यामुळेच साधी साडी आणि वेणी अश्या नॉन ग्लॅमरस रुपात उर्मिला भेटीला येईल. रणरणत्या उन्हात शूट करताना तिची कसोटी लागतेय. भूमिकेला पुरेपुर न्याय देण्यासाठी उर्मिलाने कंबर कसली आहे.


KGF 2 मधील यशच्या अभिनयाचं कंगनानं केलं कौतुक


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवरील मतं कंगना सोशल मीडियावर मांडत असते. नुकतीच कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं अभिनेता यशचं कौतुक केलं आहे.