मुंबई : लॉकडाऊन काळात सगळ्यात मोठा आणि पहिला धक्का भारताला बसला तो इरफान जाण्याचा. गेल्या दोन वर्षापासून त्याची सुरु असलेली कर्करोगाविरोधातली झुंज अपयशी ठरली. त्यानंतर इरफानचा मुलगा अधेमधे त्याच्या वडिलांचे फोटो टाकत होता. आता त्याच्या पत्नीने, सुतापा सिकदरने एक पोस्ट शेअर केली आहे.


इरफान हा आउटसायडर होता. अत्यंत कष्टाने तो पुढे आला होता. आता त्याच्या पत्नीने एक पोस्ट शेअर करत इरफानची कमिटमेंट तर सांगितली आहेच. शिवाय, आऊटसायडर्सबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरु आहे त्यातही भाग घेत एक सूचक वक्तव्य केलं आहे. सुतापाने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ती म्हणते, इरफान आऊटसायडर होता. त्याने काम करायला सुरूवात केल्यानंतर अनेक वर्षं तो सिनेमासिकांच्या कव्हरपेजवर आला नाही. त्याला त्यासाठी खूप वेळ लागला. पण तो कधीच नैराश्यात गेला नाही. तो कधीच डिप्रेस झाला नाही. आपण इथे कशासाठी आलो आहोत ते त्याला माहीत होतं. उत्तम काम करणं.. आपल्याला जे करायचं आहे त्यात चांगल्य़ा संधी शोधणं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे त्यानं ठरवलं होतं. कामाला एकदा देव मानलं की ते तुमच्यासाठी सर्वस्व होतं, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बाहेरून इंडस्ट्रीत येणाऱ्यांना बॉलिवूड कशी वागणूक देतं हे अनेक लोक सांगू लागले आहेत. अशात सुतापाच्या या पोस्टने एक सकारात्मक ऊर्जा भरली आहे. इंडस्ट्रीत शेकडो मंडळी काम करायला येतात. त्यांना चांगल्या लोकांसोबत काम करायचं असतं. त्यांना प्रसिद्धी, पैसा हाच त्यांचा हेतू नसतो. ती गरज असतेच. पण त्याहीपलिकडे चांगल्या लोकांसोबत.. चांगल्या कामाचा भाग होणं त्यांना आवडत असतं. त्या सगळ्याचं प्रतिनिधित्व इरफान खान करत होता हे या पोस्टमधून स्पष्ट होतं.


ही पोस्ट लिहिताना इरफान खानची पत्नी म्हणते, तुम्ही जे काम करायलाा आला आहात ते त्यात अध्यत्म शोधू लागलात तर त्यातून असं दु:ख वाट्याला येत नाही. कारण, तुमचं प्राधान्य वेगळं होतं. इरफान इंडस्ट्रीत आल्यानंतर अशा नामांकित मॅगझिन्सच्या कव्हरवर यायला त्याला अनेक वर्षं लागली होती.


सुतापा यांची ही पोस्ट खूपच व्हायरल होते आहे. एकिकडे सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना सुतापाच्या या पोस्टमुळे अनेकांना ऊर्जा मिळाली आहे. म्हणूनच ही पोस्ट व्हायरल होताना दिसते आहे.


सुतापा यांची फेसबुक पोस्ट