मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत असून आता अंतिम टप्प्यातील उमेदवारांची नावे जाहीर होत आहे. त्यामुळे, महत्वाच्या आणि उत्सुकता लागलेल्या मतदारसंघात उमेदवारांची नावे घोषित केली जात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या कन्येला अनुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. आता, सना मलिक यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad pawar) यांच्या पक्षाने फहाद अहमद यांना अनुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. फहाद अहमद हे समाजवादी पक्षातील नेते होते, पण त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कराचे पती आहेत. समाजवादी पक्षाकडून येथील मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून ते इच्छुक होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडून (NCP) त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  


अनुशक्तीनगर मतदारसंघात आमच्याकडे खूप चांगले कार्यकर्ते आहेत, मात्र फहाद अहमद हे काही महिन्यांपासून तिकडे स्थानिक आहेत. या उमेदवारीसाठी तेथील निष्ठावंत नाराज आहेत, मात्र राजकारणात संख्येला महत्त्व आहे, असे म्हणत फहाद अहमद यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. तसेच, फहाद हे राष्ट्रवादीकडून लढणार का?, या प्रश्नावरही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय. मी आज राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यांचा पक्षप्रवेश करूनच मी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. 


फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती असून त्यांच्यावर सध्या समाजवादी पक्षाची युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रची जबाबदारी होती. त्यामुळे, राज्यात समाजवादी पक्षाकडून ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण, अनुशक्ती नगरमधून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे आमदार आहेत. सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रीय आहेत. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली असून येथून सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीमध्येही राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून या जागेवर उमेदवार उभा करण्यात आला आहे. फहाद अहमद हे समाजवादी पक्षातून राष्ट्रवादी आले अन् उमेदवारी जाहीर झालीय.  दरम्यान, गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेतील उमेदवाराल येथे द्वितीय क्रमांकाचे मताधिक्य मिळाले आहे.


अनुशक्तीनगर मतदारसंघात 2019 साली काय


अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक 65,217 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. दोघांमधील विजयाचे अंतर 12,751 मतं एवढं आहे.  तर, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे 39,966 मते मिळवून विजयी झाले होते. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत आहे.


हेही वाचा


शरद पवारांची 9 उमेदवारांची तिसरी यादी, चिंचवडचा पत्ता उलगडला; धनंजय मुंडेंविरुद्धही उमेदवार ठरला