Priya Bapat :  आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि आशय संपन्न भूमिकांमुळे अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. तिच्या सोज्वळ भूमिका जितक्या प्रेक्षकांना भावतात तितक्याच तिच्या इतरही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. प्रियाची प्रेक्षकांना सर्वात जास्त भावलेली आणि तिची प्रभावशाली भूमिका म्हणजे पुर्णिमा गायकवाड. प्रियाने 'सिटी ऑफ ड्रीम्स'मध्ये एका राजकीय घराण्यातील महिला नेत्याची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे ती या सीरिजमध्ये महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री देखील झाल्याचं पाहायला मिळालं. 


राजकारणातील डाव-प्रतिडाव यांवर आधारित या सीरिजची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे तर प्रियाने साकारलेली महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री ही भूमिका पाहून सुप्रिया सुळे यांनी देखील तिचं कौतुक केलं. प्रियाने नुकतीच कुणाल विजयकर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये प्रियाने याविषयी भाष्य केलं आहे. 


अन् सुप्रिया सुळेंचा मला मेसेज आला - प्रिया बापट


तू सिटी ऑफ ड्रीम्स या सीरिजमध्ये सुप्रिया सुळेंसारखी दिसली आहेस, असं कुणाल विजयकर यांनी म्हटलं. त्यावर प्रियाने कौतुकास्पद हास्य केलं. आपण कोणतीही राजकीय कमेंट करायची नाही, असं प्रियाने म्हटलं. पण पुढे सुप्रिया सुळेंविषयी बोलताना प्रियाने म्हटलं की, पण मला असं वाटतं की, त्यांनी ती सीरिज पाहिली आहे. कारण त्यानंतर त्यांचा मला मेसेज आला होता. 


सिटी ऑफ ड्रीम्स ही सीरिज महाराष्ट्राच्या राजकीय खेळावर आधारित होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारण आणि त्यामध्ये नात्यांची होणार वाताहत या सगळ्यावर भाष्य करण्यात आलं होतं. प्रिया बापटसह सचिन पिळगांवकर, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या सगळ्यांसोबत काम करण्याच्या अनुभवावर प्रिया म्हणाली की, हा अनुभव खूपच सुंदर होता. मला ही संधी मिळणं हीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. कारण ही गोष्टच पूर्णिमा गायकवाडची आहे. मला ती भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. 






ही बातमी वाचा : 


VIDEO : फिर से ठोको ताली...! नवजोत सिंह सिद्धू यांची कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा एन्ट्री, अर्चना सिंहचं काय होणार?