Sunny Leones Mathura Event Called Off: सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ती अनेकदा कार्यक्रम, चित्रपट किंवा गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. सनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकतंच सनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु, चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. अलिकडेच तिचा उत्तर प्रदेशातील मथुरेत कार्यक्रम होणार होता. हा कार्यक्रम न्यू पार्टीच्या संबंधित होता. मात्र, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तिच्या या कार्यक्रमाला संतांकडून विरोध कला जात होता. पण सतांकडून या कार्यक्रमाला विरोध होण्यामागचं कारण काय? जाणून घेऊयात.
साधू संतांकडून कार्यक्रमाला विरोध
गुरूवारी 1 जानेवारी रोजी मथुरेतील काही हॉटेलमध्ये न्यू इअर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मथुरेतील हॉटेल ललिता ग्राऊंड आणि हॉटेल दा ट्रक या दोन्ही हॉटेलमध्ये सनी लिओनीचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाची माहिती सार्वजनिक होताच स्थानिक संतांनी त्यावर आक्षेप घेतला. श्रीकृष्ण जन्मभूमि संघर्ष न्यासचे सदस्य दिनेश फलाहरी यांनी प्रशासनाला पत्र लिहून या कार्यक्रमाविरोधात औपचारिक निषेध नोंदवला. त्यांनी मथुरा ही भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी असून, येथे धार्मिक श्रद्धा आणि परंपरा खोलवर रूजलेल्या असल्याचे सांगितले.
सनी लिओनीचा अखेर कार्यक्रम रद्द करण्यात आला
अशा पवित्रभूमीत अशा प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम ब्रजभूमी आणि सनातन धर्माच्या प्रतिमेला धक्का पोहोचवू शकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, असे कार्यक्रम अश्लीलतेला प्रोत्साहन देणारे ठरू शकतात, असेही त्यांनी नमूद केले आहे. संतांच्या निषेधानंतर आयोजकांनी अखेर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. द ट्रंक बारचे पार्टनर मितुल पाठक यांनी सांगितले की, स्थानिक लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सनी लिओनी स्टेजवर कोणतेही सादरीकरण करणार नव्हती. तर, ती केवळ डीजे म्हणून उपस्थित राहणार होती. मात्र, कार्यक्रमाबाबत गैरसमज पसरवण्यात आले, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, आयोजकांकडून तिकीट खरेदी केलेल्या प्रेक्षकांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणावर अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या प्रकरणानंतर सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.