Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनचा 10 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन वाढवला आहे.  दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आज जॅकलिनच्या जामीन याचिकेवर सुनावणी केली. यावेळी याबाबतचा निर्णय दिला. 


सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाी सध्या ईडीकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात जॅकलीन सहआरोपी आहे. तिच्या अंतरिम जामीन याचिकेवर आज सुनावणी होती. यावेळी जॅकलिन फर्नांडिस  वकिलाच्या वेशात पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. यावेळी याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने तिच्या अंतिरम जामीनात वाढ केली. या प्रकरणई आता 10 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 


गेल्या काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल 15 तास जॅकलिनची चौकशी केली होती. ईडीच्या चौकशीनंतर सुकेश आणि जॅकलिनमध्ये मैत्री असल्याचे समोर आले. त्यानंतर पटियाला कोर्टालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर जॅकलिनला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे 26 सप्टेंबर रोजी ती कोर्टात हजर राहिली होती. 26 सप्टेंबर रोजी पटियाला हाऊस कोर्टातून 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जॅकलिनचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांतर आज त्यामध्ये 10 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.  
 
नेमकं काय आहे प्रकरण? 
200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर त्याने दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.  


सुकेशकडून जॅकलिनला महागड्या भेटवस्तू


सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. याच पैशातून त्याने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. जॅकलिन फर्नांडिला देखील त्याने अनेक महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रूपये होती. तर प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली 36 लाख रूपयांची 4 पर्शियन मांजरं देखील जॅकलिनला देण्यात आली होती.