Mi Savitribai Jyotirao Phule serial: ..तिच्या पाऊलवाटेवर काटे होते. पण डोळ्यात स्वप्न होती. तिने पराकोटीचा विरोध सहन केला. पण ज्ञानाचा दिवा कधी विझू दिला नाही.. "मी सावित्रीबाई जोतीराव फुले" ही स्टार प्रवाहवरील ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री मधुराणी गोखले आणि राजकारणी तसेच अभिनेते अमोल कोल्हे प्रमुख भूमिकेत आहेत. खऱ्या आयुष्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांनी समाजाला दिशा दाखवली. त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, ऐतिहासिक मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' च्या सेटचा भव्य दिव्य अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या अनावरण सोहळ्याच्या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे, सावित्रीबाई जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार्या मधुराणी गोखले, स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे तसेच या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.
या अनावर सोहळ्याने केवळ सेटचा पडदा उघडला नाही तर, महाराष्ट्राच्या इतिहासातील एका प्रखर सामाजिक क्रांतीचा पुनर्जन्म झाला आहे. स्त्री शिक्षणासाठी, समतेसाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या सावित्रीबाईंच्या संघर्ष, त्याग आणि धैर्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारा हा सेट त्या काळातील सामाजिक वास्तव, वेदना आणि नव्या आशेचे जिवंत चित्र साकारतो. प्रत्येक भिंत, प्रत्येक रचना आणि प्रत्येक तपशील त्या काळातील संघर्षकथांना जणू शब्द देतो. दरम्यान, कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांच्या अभ्यासपूर्ण आणि कल्पकतेतून भव्य सेट साकारण्यात आला आहे.
या ऐतिहासिका मालिकेविषयी कलाकारांच्या भावना
या मालिकेविषयी अभिनेत्री मधुराणी गोखले म्हणाली, "सावित्रीबाई फुले या युगस्त्री होत्या. खरंतर इतक्या उंच आणि आभाळाएवढं व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आज आपण स्वतंत्रपणे शिक्षण घेत आहोत. आपआपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत आहोत. प्रगती करत आहोत. परंतु, दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने या हक्कासाठी प्रचंड संघर्ष केला होता. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खरंच सन्मानाची गोष्ट आहे. या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहे. मनात या मालिकेविषयी उत्सुकता, हुरहुर तसेच थोडंपणही आहे. प्रेक्षकांनी आम्हाला नक्कीच साथ द्यावी. एवढीच अपेक्षा..".
या मालिकेविषयी डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, "लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलं आहे. माझ्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणं हे एक वेगळंच आव्हान आहे. बदलाची मशाल उंचावणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारे महात्मा जोतीराव फुले त्यांचे थोर विचार आजही जिवंत आहे. स्टार प्रवाहसोबतचं नातं माझ्यासाठी खूप खास आहे. 'राजा शिवछत्रपती' या खासा मालिकेनं मला आयुष्यात मोठी ओळख दिली. जवळपास 17 वर्षांनंतर आज मी स्टार प्रवाहसोबत अभिनेता तसेच निर्माता म्हणून काम करतोय. सावित्रीबाई फुले या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आहेत आणि कायम राहतील. त्यांच्या योगदानाबद्दल शब्दांत वर्णन करणं अवघड आहे. त्यांचा इतिहास मालिकेतून साकार करताना मला खूप जास्त भावनिक जाणवतं". दरम्यान ही मालिका 5 जानेवारी 2026पासून स्टार प्रवाहवर 7:30 वर प्रसारित होणार आहे.