Highest Earning Actor 2025: हॉलिवूडमध्ये स्टार्सच्या मानधनाचा आलेख दिवसेंदिवस चढतच चालला आहे. कधी काळी 1 मिलियन डॉलरची डील मोठी मानली जायची; पण आज मोठ्या फ्रँचायझी सिनेमांसाठी कलाकार थेट 100 ते 150 मिलियन डॉलरपर्यंत फी घेत आहेत. 2025 मध्ये तर हा ट्रेंडही मोडीत निघाला. वयाच्या 63 व्या वर्षी टॉम क्रूज जगातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला आहे. वयाच्या 63 व्या वर्षीही हा अभिनेता कमाईच्या बाबतीत तरुण स्टार्सनाही मागे टाकत आहे. एका चित्रपटासाठी मिळालेली त्याची फी इतकी प्रचंड आहे की, त्या रकमेत तब्बल पाच वेळा ‘धुरंधर’सारखे चित्रपट तयार होतील.  

काही अहवालांनुसार, टॉम क्रूजने ‘मिशन इम्पॉसिबल: द फायनल रेकनिंग’ या चित्रपटासाठी तब्बल 130 ते 150 मिलियन डॉलर (सुमारे साडे 13 अब्ज रुपये) इतकी कमाई केली आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झाला असून, ही टॉम क्रूजची शेवटची ‘मिशन इम्पॉसिबल’ फिल्म असल्याचं सांगितलं जात आहे.

10 वर्षांनंतर पुन्हा अव्वल स्थान

या कमाईसह टॉम क्रूजने तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्याचं स्थान पटकावलं आहे. याआधी 2012 मध्ये ते या यादीत अव्वल होते, तेव्हा त्याने 75 मिलियन डॉलर कमावले होते. यावेळी त्यांनी गेल्या 9 वर्षांपासून अनेकदा नंबर वन राहिलेल्या ड्वेन जॉन्सनलाही मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे, टॉम क्रूजची कमाई इतकी प्रचंड आहे की दुसऱ्या क्रमांकावरील अभिनेत्यालाही त्याच्या निम्मी फीही मिळालेली नाही.

इतर कलाकारांची फी

या यादीत दुसऱ्या स्थानावर डॅनियल क्रेग आहे. ‘नाइव्स आउट’ सीरिजच्या नव्या चित्रपटासाठी त्याने सुमारे 50 मिलियन डॉलर ,म्हणजे सुमारे 415 कोटी कमावले. तर जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून कॅमेरॉन डियाजने बाजी मारली आहे. तिने ‘बॅक इन अ‍ॅक्शन’ या चित्रपटासाठी 45 मिलियन डॉलरची म्हणजे  375 कोटी रुपये फीस घेतली.

याशिवाय ब्रॅड पिटने त्याच्या रेसिंगवर आधारित ‘एफ1’ चित्रपटासाठी 30 मिलियन डॉलर घेतले, तर लिओनार्डो डिकॅप्रियोला ‘वन बॅटल आफ्टर अनदर’साठी 25 मिलियन डॉलर मिळाले. अभिनेता अ‍ॅडम सँडलरने ‘हॅपी गिलमोर 2’ साठी 20 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

भारतीय अभिनेत्यांमध्ये रजनीकांत अव्वल

भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये तमिळ सुपरस्टार रजनीकांत अव्वल ठरले आहेत. त्यांच्या ‘कूली’ या चित्रपटासाठी त्यांनी 20 मिलियन (165 कोटी )डॉलरपेक्षा अधिक फी घेतली आहे. यामुळे हॉलिवूडमधील स्टार पॉवरचा हा नवा काळ सुरू झाल्याचं बोललं जात आहे.