Star Pravah Parivar Puraskar 2024: स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची (Star Pravah Parivar Puraskar 2025) उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. प्रवाह परिवाराच्या या दिमाखदार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या अशोक मामांच्या सन्मानासाठी महेश कोठारे, निवेदिता सराफ, वर्षा उसगांवकर, निशिगंधा वाड, किशोरी अंबिये आणि संपूर्ण सराफ कुटुंब उपस्थित होतं. पण, अशोकमामांच्या डोळ्यांत मात्र कुणाची तरी कमी भासत होती. पण त्याच क्षणी भर मंचावर अशोक मामांसाठी निनावी फोन आला आणि फोनवर समोरुन बनणारा आवाज ऐकून अख्खा मंच स्तब्ध झाला. 


स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांच्या सन्मानासाठी मंचावर सर्व दिग्गज एकत्र जमले आणि त्यांना एका व्यक्तीची कमतरता भासत होती. पण अखेर एक फोन आला आणि ती कमी पूर्ण झाली. सर्वांचे डोळे पाणावले. कुणी हुंदका देऊन, तर कुणी हमसून हमसून रडताना दिसलं. सारेच गहिवरले. भर मंचावर आलेला फोन कुणाचा होता माहितीय? तो फोन होता दिवंगत दिग्गज मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा. या आभासी फोनमधला संवाद काहीसा असा होता.  


Star Pravah Parivar Puraskar 2024: हॅलो अशोक, मी आकाशातून जमिनीवरचा तारा बघतोय; लक्ष्मीकांत बेर्डेंचा अशोक सराफांना आभासी फोन


लक्ष्मीकांत बेर्डेंचा अशोक सराफांना आभासी फोन


"हॅलो... हॅलो... अशोक... अशोक... अशोक... धनंजय माने इथेच रहातात का? धनंजय माने फक्त इथे रहात नाहीत तर, ते इथे राज्य करतात. अरे आपण जवळपास 50 चित्रपट एकत्र केले. तुझ्यासारखा ॲक्शन आणि रिॲक्शन देणारा दुसरा कलाकार मी माझ्या कारकीर्दीत तरी नाही बघितला. तुझा आज होणारा सन्मान बघून डोळे भरुन आले बघ. आपला मित्र आज एवढ्या उंचीवर पोहोचला, हे ऐकून आणि बघून आनंदाने उर भरुन आला. लोकं आकाशात तारे बघतात... मी आकाशातून जमिनीवरचा अशोक नावाचा तारा रोज बघत असतो. तुझ्यासारखा अभिनेता, सच्चा माणूस आणि दिलदार मित्र कुणी नाही. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहिल. अशोक, माफ कर हं...एवढ्या वर्षांची सवय आहे अशोक म्हणायची. पण आता तू फक्त अशोक राहिला नाही आहेस. पद्मश्री, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ झाला आहेस. अशोक आज तू घरी जाताना पाऊस पडला ना तर तुझ्या गाडीची काच खाली करुन हात बाहेर काढ. हातावर पाण्याचे थेंब पडले तर ते माझे आनंदाश्रू आहेत असं समज. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तूला खूप खूप शुभेच्छा अशोक. येतो..."  






दरम्यान, लेखक चिन्मय कुलकर्णी आणि मोहित कुंटेच्या लेखणीतून हा हळवा क्षण रेखाटण्यात आला आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 सोहळा पाहून तुम्हा आम्हा सर्वांना या हळव्या क्षणाचा साक्षीदार होता येणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Chhaava Movie: 'नटसम्राट संतोष जुवेकर आलेत, पण...' ; संतोष जुवेकरच्या अक्षय खन्नाबाबतच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी झोडपलं