Song Jae Rim Death: दक्षिण कोरियाचा (South Korea) लोकप्रिय अभिनेता सोंग जे रिम (Song Jae-Rim) याचं वयाच्या 39 व्या वर्षी निधन झालं आहे. 12 नोव्हेंबर रोजी त्याचं राहत्या घरी निधन झालं. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सोंग जे रिम 'द मून एम्ब्रेसिंग द सन' आणि 'क्वीन वू' या गाजलेल्या के-ड्रामामध्ये झळकला होता. यामुळे त्याला जगभरात ओळख मिळाली होती. आपल्या लाडक्या कोरियन स्टारनं अचानक जगातून एग्झिट घेतल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. सोंग जे रिम यांच्या निधनानं जगभरातील चाहते शोकसागरात बुडाले आहेत.
मृत्यूचं कारण अस्पष्ट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोंग जे रिमचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आला. नेमका त्याचा मृत्यू कसा झाला? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्याच्या घरातून एक सुसाईड नोटही सापडली आहे.त्यामुळे सोंग जे रिमनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, सोंग जे रिमच्या कुटुंबीयांनी किंवा सेऊल पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही आणि पोलीस अद्याप या प्रकरणी काहीही बोलत नाहीत.
आत्महत्या की, घातपात?
कोरियन स्टार सोंग जे रिमचं निधन झालं आहे. त्याच्या राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला. तसेच, त्यासोबत एक चिठ्ठीही आढळून आली आहे. पण, इतक्या मोठ्या स्टारचा मृतदेह आढळून आल्यामुळे कोरियामध्ये खळबळ माजली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. तसेच, सोंग जे रिमच्या मृत्यूमागे कुणाचा हात तर नाही? या अँगलनंही पोलिसांचा तपास सुरू आहे.
14 नोव्हेंबरला अंत्यसंस्कार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोंग जे रिम याच्या पार्थिवावर 14 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचे चाहते आणि कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का आहे. सोशल मीडियावर सोंग जे रिमला चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
2009 मध्ये सॉन्ग जे रिमनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. एक दशकांहून अधिक काळ तो कोरियन इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. आजवरच्या कारकीर्दीत त्यानं अनेक हिट्स दिले आहेत. पण, 'द मून एम्ब्रेसिंग द सन' आणि 'क्वीन वू' या के-ड्रामामुळे सॉन्ग जे रिमला जगभरात प्रसिद्धी मिळाली होती. त्यानं 2011 मध्ये 'द मून एम्ब्रेसिंग द सन'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. हा एक हिस्टॉरिकल ड्रामा होता. राजाचा सर्वात जवळचा आणि विश्वासू अशा बॉडीगार्ड किम जे वॉनची भूमिका सोंग जे रिमनं साकारली होती. जगभरात सॉन्ग जे रिमच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर त्यानं इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.