Parvathy Thiruvothu:दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पार्वती तिरुवोथू (Parvathy Thiruvothu) हिने एका मुलाखतीत तिच्या बालपणी घडलेल्या धक्कादायक आणि घृणास्पद घटनांबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे. हे अनुभव शेअर करताना ती भावूक झाली होती. तिच्या मते, अशा घटना कोणत्याही मुलीच्या आयुष्यात घडू नयेत, पण दुर्दैवानं त्या वास्तवाचा भाग आहेत.

Continues below advertisement

एका पॉडकास्टमध्ये बोलताना पार्वतीने लहान वयापासूनच तिला अनेक वेळा अनोळखी पुरुषांच्या विकृत वागणुकीला सामोरं जावं लागल्याचं सांगितलं. प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत तिच्यासोबत अशा घटना घडल्या, ज्यांचा मानसिक आणि शारीरिक त्रास तिने अनेक काळ सहन केला.

अंगावर शहारे आणणारा प्रसंग केला शेअर

पार्वतीने सांगितलेला एक प्रसंग विशेषतः अंगावर शहारे आणणारा आहे. ऑटो रिक्षात बसलेली असताना एका व्यक्तीनं तिला चिमटा काढला, तर दुसऱ्या वेळी रेल्वे स्टेशनवर वडिलांसोबत असताना गर्दीत एका पुरुषानं मुद्दाम तिच्या छातीवर जोरात हात मारला आणि तो क्षणात निघून गेला. “तो साधा स्पर्श नव्हता, तर जाणूनबुजून केलेली कृती होती. मी खूप लहान होते आणि त्या वेदना मला आजही आठवतात,” असं ती म्हणाली.

Continues below advertisement

आईनं शिकवलं स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं

या सगळ्या अनुभवांचा तिच्या आयुष्यावर खोल परिणाम झाला असल्याचं ती म्हणाली. तिच्या आईनं तिला लहानपणापासूनच स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं, कुठे सावध राहायचं आणि पुरुषांचे वाईट स्पर्श कसे ओळखायचे, हे शिकवलं. “एका आईला आपल्या मुलीला अशा गोष्टी शिकवाव्या लागतात, हीच सगळ्यात वेदनादायक गोष्ट आहे,” असं पार्वती म्हणाली.

याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी उघडपणे अश्लील वर्तन करणाऱ्या पुरुषांचे अनुभवही तिनं सांगितले. “तेव्हा त्या गोष्टींचा अर्थ कळत नव्हता. पण अशा अनुभवांचा आपल्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो, हे खूप उशिरा उमगतं,” असं ती म्हणाली.

ऋतिक रोशनच्या प्रोजेक्टमध्ये झळकणार

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर,  पार्वती लवकरच हृतिक रोशनच्या HRX Films अंतर्गत तयार होणाऱ्या ‘द स्टॉर्म’ या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. अजितपाल सिंग दिग्दर्शित या शोमध्ये अलाया एफ, सृष्टी श्रीवास्तव, सबा आझाद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘बेंगळुरू डेज’, ‘चार्ली’, ‘उयिरे’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.