Satej Patil: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा सुपर संडे आहे. त्यानिमित्ताने सर्वच नेते आज मतदानापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज (11 जानेवारी) सकाळी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी 'मिसळ पे चर्चा' कार्यक्रम घेत असताना महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे खासदार धनंजय महाडिक कोल्हापुरात ज्या परिसरामध्ये राहतात अगदी त्यांच्या समोर असलेल्या मैदानामध्येच सतेज पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली.
बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहिला अशी एक ओळ लिहिली तरी बास
बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहिला अशी एक ओळ लिहिली गेली तरी ती बास आहे अशा शब्दात भावनिक आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज तयार केली असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की जिल्ह्यामध्ये एका बाजूला महायुतीचे दहा आमदार दिले आहेत तर दुसऱ्या बाजूला बॅलन्स करायचा असेल तर महाविकास आघाडीला मत. तराजू एकाच बाजूला झुकला तर त्याला न्याय म्हणत नाहीत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही काल (10 जानेवारी) कोल्हापूर दौरा झाला. यावेळी रोडशो करण्यात आला. पाटील यांनी शिंदे यांनी केलेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिले. ही कुस्ती मारणारच असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली नाही
यावेळी बोलताना पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर हल्लाबोल केला. मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली नाही किंवा उमेदवारी अर्ज भरून मागे घेतला नाही, अशा शब्दात खासदार महाडिक यांच्यावर पाटील यांनी तोफ डागली. विशेष म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच कृष्णराज महाडिक यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाने काढलेल्या आदेशानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली. तोच धागा पकडत सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांच्यावर हल्लाबोल केला.
इतर महत्वाच्या बातम्या