Geetanjali Angmo on Bollywood: सध्या मनोरंजनविश्वात अनेक हॉलीवुडपटांनी लक्ष वेधून घेतलं आहे. दुसरीकडे बॉलीवूडमध्ये 'रामायण' या महाकाव्याची एकच चर्चा रंगलीय. दरम्यान, सामाजिक उद्योजिका आणि शिक्षण व हवामान तज्ञ सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अँग्मो यांनी दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या 'द ओडिसी' या नव्या चित्रपटाचे कौतुक करताना बॉलिवूडला सुनावलंय.  त्यांनी नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये 2024 मध्ये न्यूयॉर्कमध्ये नोलन यांची भेट आठवत बॉलिवूडने भारतीय महाकाव्यांना अधिक संवेदनशीलता, वैचारिक खोली आणि भव्यतेसह पडद्यावर आणताना समाजाला घडवणाऱ्या शक्तीशाली माध्यमात आपली भूमिका शोधण्याची  गरज असल्याचं मत व्यक्त केलं. 

Continues below advertisement

सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या 26 दिवसांच्या उपोषणानंतर गीतांजली अँग्मो यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. या आंदोलनात सोनम वांगचूक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत NEET पेपरफुटीनंतर देशातील परीक्षा व्यवस्थेत सुधारणा आणि घडल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली होती. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अँग्मो यांनी ' द ओडिसी' पाहिल्यानंतर x माध्यमावर केलेल्या पोस्टची एकच चर्चा आहे.

काय म्हणाल्या गीतांजली अँग्मो?

नोलन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत गीतांजली यांनी 'द ओडिसी' मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव "अविस्मरणीय आणि विलक्षण" असल्याचे म्हटलं.त्या म्हणाल्या, " काल ओडिसी पाहिला. 2024 मध्ये न्यूयॉर्कमध्ये ख्रिस्तोफर नोलन यांची योगायोगाने भेट झाली होती. त्या वेळी ज्या गोष्टींवर चर्चा झाली होती, त्या आज पडद्यावर पाहणे हा अतिशय विलक्षण अनुभव होता. या चित्रपटातील नायकाचा प्रवास, धर्म, नियती, वनवास, मोह, घरी परतणे आणि संघर्षातून घडणारा माणूस हे विषय भारतीय कल्पनाविश्वाशी अतिशय जवळचे वाटतात."

Continues below advertisement

 

यानंतर त्यांनी भारताच्या समृद्ध कथांचा उल्लेख करत बॉलिवूडला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, "भारताकडे अशा महाकाव्यांचा अक्षरशः खजिना आहे. कल्पना करा, हीच महाकाव्ये त्याच भव्यतेने संवेदनशील त्याने आणि बौद्धिक खोलीसह सिनेमात आणली तर?  सिनेमा हा केवळ मनोरंजन नसतो. तो मनाला आकार देणारा असतो. कदाचित बॉलिवूडने पुन्हा एकदा समाजाला घडवणाऱ्या शक्तीशाली माध्यमात आपली भूमिका शोधण्याची गरज आहे." असं त्या म्हणाल्या.दरम्यान, सोनम वांगचुक यांनी 23-24 जुलै 2026 रोजी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि इतर सरकारी प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आपले 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले. त्यानंतर 25 जुलै 2026 रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला.