Poetess Shanta Shelke House Collapsed: मराठीतल्या साहित्याचा (Marathi Literature) अमूल्य ठेवा जपणाऱ्या आणि आपल्या शब्दांची गुंफण घालून कवितांनी स्तब्ध करणाऱ्या मराठीतील ज्येष्ठ कवयित्री, गीतकार, लेखिका, अनुवादक आणि पत्रकार असलेल्या शांता शेळके (Poetess Shanta Shelke). मराठीतल्या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री (Marathi Poetess). मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि संवेदनशील लेखिका म्हणून त्यांची ओळख. आता त्या आपल्यात नाहीत, पण, त्यांच्या आठवणी सांगणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, त्यांचं बालपणे जिथे गेलं, जिथे त्यांच्यावर शब्दांचे संस्कार झाले, तो त्यांचा वाडा. पण, सतत कोसळणाऱ्या पावसानं ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके (Veteran Poetess Shanta Shelke) यांच्या वाड्याचा काही भाग कोसळला आहे.
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके (Shanta Shelke) यांच्या स्मृतींशी निगडित असलेल्या मंचर (Manchar Pune) येथील ऐतिहासिक वाड्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वाड्याचा काही भाग कोसळल्यानं साहित्यप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हा केवळ एका इमारतीचा भाग कोसळण्याचा प्रकार नसून, मराठी साहित्याच्या सांस्कृतिक वारशालाच तडा गेल्याची भावना व्यक्त केली जातेय.
पुणे जिल्ह्यातील (Pune News) आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) मंचर येथे असलेला शांता शेळके यांचा वाडा आजही त्यांच्या साहित्यिक आठवणी जपून उभा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ऐतिहासिक वास्तूचा काही भाग शुक्रवारी कोसळला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी वारसा जतनाच्या दृष्टीनं हा अत्यंत चिंताजनक प्रकार मानला जात आहे.
कवयित्रींच्या स्मृतींशी जोडलेली ही वास्तू तातडीनं जतन करा; स्थानिकांची मागणी
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाड्याची अवस्था मागील काही वर्षांपासून अगदीच जीर्ण झालेली. मंचर नगरपंचायतीनं वेळोवेळी दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रभावी संवर्धन आणि दुरुस्ती न झाल्यानं अखेर पावसाच्या तडाख्यात वाड्याचा काही भाग कोसळला. या घटनेनंतर मंचरमधील ग्रामस्थ, साहित्यप्रेमींनी तीव्र चिंता व्यक्त केलीय. मराठी साहित्यविश्वाला असंख्य अजरामर कविता, गीतं आणि लेखन देणाऱ्या कवयित्रींच्या स्मृतींशी जोडलेली ही वास्तू तातडीनं जतन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिकांचं म्हणणं आहे की, हा वाडा केवळ एक जुना बांधकामाचा नमुना नसून मराठी साहित्याच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. त्यामुळे या वास्तूचं तातडीने संवर्धन, दुरुस्ती आणि संरक्षण करण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर पावलं उचलावीत. शांता शेळके यांच्या स्मृतींना जपणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूचे भवितव्य आता प्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून असून, सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना केली जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.
मराठीतल्या साहित्याचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या कवयित्री शांता शेळके
शांता जनार्दन शेळके या मराठीतील ज्येष्ठ कवयित्री, गीतकार, लेखिका, अनुवादक आणि पत्रकार होत्या. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील मंचर इथे झाला. मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि संवेदनशील लेखिका म्हणून त्यांची ओळख. कविता, ललित लेख, कथा, कादंबरी, बालसाहित्य, अनुवाद आणि चित्रपट गीतलेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलंय.
मराठी सिनेमे आणि भावगीत विश्वातही त्यांचं योगदान अमूल्य आहे. त्यांनी लिहिलेली अनेक गीतं आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. 'ही वाट दूर जाते', 'रेशमाच्या रेघांनी', 'जाईन विचारत रानफुला', 'काटा रुते कुणाला', 'तोच चंद्रमा नभात' यांसारखी अनेक अजरामर गीतं त्यांनी लिहिलीत. त्यांच्या गीतांना सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे यांसारख्या दिग्गज संगीतकारांनी संगीत दिलंय, तर लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण दाते, सुरेश वाडकर यांसारख्या गायकांनी स्वरबद्ध केलंय. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय.
