Sonalee Kulkarni Share Painful Experience: सिनेसृष्टी (Entertainment World) जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढीच तिची दुसरी बाजूसुद्धा आहेच. याच दुसऱ्या बाजूबाबत आजवर अनेक कलाकारांनी अगदी उघडपणे सांगितलं आहे. अनेकदा अभिनेत्रींसोबतच अभिनेत्यांनीही त्यांना आलेल्या नको त्या अनुभवाबाबतही उघडपणे सांगितलं आहे. अनेकदा तर काम केल्यानंतरही कित्येक वर्ष निर्मात्यांनी कलाकारांना पैसेच दिलेले नाहीत, असेही अनुभव कलाकारांनी सांगितले आहेत. अशातच आता मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींच्या (Top Actress) यादीत समाविष्ट होणारी अप्सरा म्हणजेच, सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिनं तिला आलेल्या एका विचित्र अनुभवाबाबत सांगितलं आहे. 

सोनाली कुलकर्णी (Marathi Actress Sonalee Kulkarni)) म्हणजे, कित्येक तरुणांच्या गळ्यातील ताईत. फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) एखाद्या सेलिब्रिटीचं दिसणं, त्याच्या स्किन टोन आणि वय यावरुन अनेकदा वाईट अनुभवांचा सामना करावा लागल्याचं अनेक कलाकारांनी सांगितलंय. असाच धक्कादायक अनुभव मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीला आला आहे. सोनालीला काही दिवसांपूर्वी एक हिंदी ओटीटी (OTT) शो ऑफर करण्यात आलेला. सगळं ठरलं, शुटिंगची तारीख, पैसे सगळं सगळं फिक्स झालं पण, अचानक तिला त्या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. "तू वयानं मोठी दिसतेस", असं सांगून सोनालीला प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आल्याचं तिनं सांगितलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनाली कुलकर्णीनं याबाबत सांगितलं आहे.  

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली? (Sonalee Kulkarni Losing Work Due To The Age)

'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "मी नुकताच ओटीटीवरील एक शो साईन केलेला. त्या लेखक-दिग्दर्शक आणि पूर्ण टीमला भेटले. जशी मी आता दिसतेय तशीच मी अगदी साधा मेकअप करून त्यांना भेटायला गेलेले. त्यांनी मला त्या भूमिकेची माहिती दिलेली. त्यांनी मला भूमिकेबद्दल सांगितलं होतं की, ती अमुक अमुक वयोगटाची आहे, ती अशी दिसते, तिची पार्श्वभूमी अशी असेल वगैरे वगैरे... साधारण माझ्याच वयाची ती भूमिका होती. त्यामुळे त्या भूमिकेची एक साधारण तयारी करून त्यांना भेटायला गेले होते. जेणेकरून त्यांना आपण त्या भूमिकेत कसे दिसू याचा अंदाज येईल. आम्ही वाचन केलं. माझ्या भूमिकेबद्दल आणि शोबद्दल त्यांनी मला सांगितलं. क्रिएटिव्ह चर्चाही झाली. दोन तास आम्ही त्यावर बोलत होतो. सगळं ठरलंच होतं. फी-तारखांबद्दलसुद्धा चर्चा झाली. त्यांनी मला स्क्रिप्ट (संहिता) पाठवली. त्यावर मी अभ्यास सुरू केला. नंतर पुढच्या महिन्यात शूटिंग सुरू करू, या विचारात मी होते. इतक्यात 'तिघी'चा टीझर आला. त्यानंतर मला त्यांच्याकडून निरोप आला की, "मॅम आम्ही एक वेगळी मुलगी घेतोय..." पुढे बोलताना सोनालीनं सांगितलं की, "सोशल मीडिया फॉलोअर्स आणि लोकप्रियता या गोष्टींशिवाय तू आता वयाने मोठी दिसत आहेस..."

"चॅनलचा हा निर्णय आहे. चॅनेलला एक वेगळी हिंदीतली आणि तुमच्यापेक्षा लोकप्रिय मुलगी हवी आहे...' असं ते म्हणाले. त्यावर मी त्यांना 'ओके' म्हटलं आणि मला यामागचे नेमके निकष कळतील का? म्हणजे, पुढच्या वेळी मी तयारीत जाईन असं विचारलं. त्यावर ते 'सोशल मीडिया फॉलोअर्स आणि लोकप्रियता या गोष्टी आहेतच. पण तू आता वयानं मोठी दिसत आहेस...', असं म्हणाले. त्यावर मी त्यांना सांगितलं, "वयानं मोठी म्हणजे? भूमिकेच्या वयाची जी अपेक्षा आहे, त्या वयातच मी आता आहे आणि या वयात असंच दिसतात. बरं, मला तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष भेटलात, तेव्हा तुम्हाला हे जाणवलं नाही. मग आता अचानक तुम्हाला वय कसं दिसलं?" त्यावर ते म्हणाले, "आम्हाला 'तिघी'च्या टीझरमध्ये स्क्रीनवर तसं दिसतंय..." मग मी म्हटलं, "त्या भूमिकेची ती गरज आहे म्हणून मी तशी दिसतेय. तुम्हाला हवं तर तुम्ही लुक टेस्ट करा आणि मग ठरवा की, तुम्हाला हव्या असलेल्या भूमिकेप्रमाणे दिसतेय की नाही..." मग ते म्हणाले, "आम्ही चॅनेलशी भांडू शकत नाही..." मग मी म्हटलं, "ठीक आहे, मलासुद्धा काही सिद्ध करायचं नाही. मला भांडायचं नाही. तुम्हाला मी योग्य वाटत नसेल; तर चर्चा इथेच संपली. पण मला कळायला हवं की, नक्की प्रॉब्लेम आहे...", असं सोनाली कुलकर्णी म्हणालीय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Vishakha Subhedar On Periods: 'चालतं सगळं, देवानेच तर दिलंय... कशाला वाळीत टाकायचं'; मासिक पाळीत देवाची पूजा करण्याबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत