Sini Shetty Miss India 2022 : कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं (Sini Shetty) मिस इंडिया 2022 (Miss India 2022) चा किताब आपल्या नावे केला आहे. देशाला यंदाच्या वर्षीची मिस इंडिया मिळाली आहे. 3 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मिस इंडिया 2022 च्या अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत सिनीनं 'मिस इंडिया 2022'चा मुकूट आपल्या नावे केला. अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनर अप ठरली. मिस इंडियाच्या ग्रँड फिनालेमध्ये तिघीही खूप सुंदर दिसत होत्या.
यंदा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'मिस इंडिया 2022' ची अंतिम फेरी पार पडली. या कार्यक्रमात सर्व स्पर्धकांनी त्यांच्या सौंदर्यानं आणि आपल्या शैलीनं लोकांची मनं जिंकली. पण या शर्यतीत आघाडीवर होती, सिनी शेट्टी, जिला यावर्षीची मिस इंडिया म्हणून घोषित करण्यात आलं.
दरवेळेप्रमाणे यंदाही मिस इंडिया स्पर्धा अतिशय चुरशीची आणि मजेदार होती. स्पर्धा इतकी चुरशीची होती की, 6 परिक्षकांच्या पॅनेलनं स्पर्धकांचे सर्व पैलू लक्षात घेऊन विजेतीची निवड केली. यावेळी परिक्षकांच्या पॅनेलमध्ये मलायका अरोरा, नेहा धुपिया, दिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शामक डाबर यांचा समावेश होता. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. क्रिती सॅननपासून ते इतर अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपली जादू पसरवली.
मिस इंडिया 2022 च्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये नेहा धूपिया, कृति सेनन, मलाइका अरोरा, मनीष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरेया, मिथाली, राज यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. ग्रँड फिनालेमध्ये कृति सेनननं आपल्या परफॉर्मेंन्सनं सर्वांची मनं जिंकली. या इव्हेंटमधील एक वैशिष्ट्य म्हणजे, नेहा धुपियाला यंदा मिस इंडियाचा किताब पटकावून 20 वर्ष पूर्ण झाली असून त्याचं सेलिब्रेशनंही करण्यात आलं.
'मिस इंडिया 2022' सिनी शेट्टी आहे तरी कोण?
'मिस इंडिया 2022'चा किताब जिंकणारी सिनी शेट्टी फक्त 21 वर्षांची आहे. सध्या ती चार्टर्ड फायनान्स अॅनालिस्टचा (Chartered Financial Analyst) कोर्स करत आहे. सिनीला लहानपणापासूनच डान्सची खूप आवड आहे, तिनं वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत सिनीनं अनेक स्टेज शोसुद्धा केलेत. सध्या सिनी कर्नाटकात राहत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला होता.