Shubhangi Gokhale : मुंबई, पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव हा सगळ्यांसाठीच आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकमान्य टिळकांनी या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू या उत्सवाचं स्वरुप मोठं होऊ लागलं. त्यामुळे सध्याच्या गणेशोत्सवावर अनेकांकडून नाराजी देखील व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांनी देखील यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
शुभांगी गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला 'घरत गणपती' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचनिमित्ताने त्यांनी 'तारांगण' या युट्युब चॅनलशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद देखील उमटत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
शुभांगी गोखले यांनी काय म्हटलं?
शुभांगी गोखले यांनी म्हटलं की, 'मी पुण्यातलेही मानाचे गणपती पाहिलेत. मुंबईतलेही पाहिले आहेत. पण आता त्याचं जे अवडंबर झालंय, त्यामुळे फार चुकीच्या गोष्टी सुरु आहेत. तुम्ही सगळे सार्वजनिक गणपती करता, आराधना करता पण आता हे सार्वजनिक गणपती बंद झाले पाहिजेत. रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही ते करता आणि नंतर त्याच्या पाठिमागे तुम्ही रात्री दारु पिता, पत्ते खेळता, हे कुणी अमान्य करुच शकत नाही. याची आता गरज नाहीये. यामुळे आपणच आपल्या देवाचा अपमान करतोय.' हल्ली तर छोटी छोटी गावं देखील एक गाव एक गणपती करतात. मग हे तुम्ही का नाही करु शकत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शुभांगी गोखले यांच्या वक्तव्याचा निषेध
दरम्यान अखिल सार्वजनिक उत्सव समिती (महाराष्ट्र) यांच्याकडून शुभांगी गोखले यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर शुभांगी गोखले काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
घरत गणपती सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
भूषण प्रधान, निकिता दत्ता, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी गोखले, संजय मोने ही सगळी मंडळी असलेला घरत गणपती हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नात्यांची एक सुरेख गोष्ट या सिनेमातून सांगण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या देखील पसंतीस हा सिनेमा उतरत असल्याचं पाहायला मिळतंय.