Shubhangi Gokhale : सार्वजनिक गणेशोत्सवर आता बंद व्हायला हवेत, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांनी दिली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच त्यांनाही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. या सगळ्यात देवाची होणारी विटंबना, सणाचं होणार अवडंबर या सगळ्यावर शुभांगी गोखले यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं. पण त्यावर तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली.
यासगळ्यावर आता शुभांगी गोखले यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. शुभांगी गोखले यांनी नुकतीच बीबीसी मराठीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये आलेल्या धमक्या, हा सण आता बंद व्हावा असं का वाटतं या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे शुभांगी गोखले यांनी त्यांच्या वक्तव्याचंही स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
'माझ्या एका मताने तो उत्सव बंद नाही होणार'
गणेशोत्सवावर केलेल्या वक्तव्यानंतर झालेल्या ट्रोलिंगवर उत्तर देताना शुभांगी गोखले यांनी म्हटलं की, मला सुरुवातीला अत्यंत शिव्या देणारे मेसेज आले. अनेकांनी तर फोन नंबर शोधून धमक्या देखील दिल्या. मुलुंडच्या एका गणेशोत्सवाच्या कोणत्यातरी अधिकाऱ्यांनी तर फार अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तुला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही वैगरे असं सांगण्यात आलंय. तुम्ही त्या मंडपाच्या इथे दारु पिणार, पत्ते खेळणार, यावर मी माझं मत मांडलं तर मला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे त्यांनी म्हटलं की, मी त्यांना म्हटलं की, दादा तुमच्या शिव्या तुमच्याजवळ ठेवा, तुमच्यावर मी योग्य ती कारवाई करेनच. मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की, माझ्या एका मताने तो उत्सव पूर्णपणे बंद होणार नाही. त्यामागे खूप गोष्टी आहेत.
चोवीस तास गाणी लावणे हा कुठला उत्सव?
मी पुण्या-मुंबईत राहत नसले तरी तो गणेशोत्सव मी पाहिला होती. पण त्यामध्ये सात्विकता होती आणि खरंच तो धार्मिक होता उत्सव. माझी गणपतीवर खूप श्रद्धा आहे. पण आताची गर्दी, गोंगाट आणि मुख्यत: चोवीस तास गाणी लावणे हा कुठला उत्सव? त्यामुळे ती सात्विकता, ते पावित्र्य आपण जपत नाही आहोत. हे अनेक वर्षांपासून बघून बघून माझं मत झालं आणि ते आता व्यक्त झालं, असंही शुभांगी गोखले यांनी म्हटलं.