Paresh Raval : लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) यंदा अनेकजण आपलं नशीब आजमवणार आहेत. त्यासाठी अनेक कलाकार मंडळी देखील या लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. याआधी देखील अनेक कलाकारांनी लोकसभेचं तिकीट मिळवून दिल्लीची वाट धरली. रसिकप्रेक्षक म्हणून कलाकारवर विश्वास ठेवलेल्यांनी या कलाकारांना नेत्याच्या रुपातही पसंती दर्शवली. अनेक कलाकार आतापर्यंत दिल्लीच्या संसदेत गेले आहेत. परेश रावल, जया बच्चन, हेमा मालिनी, स्मृती इराणी यांसारख्या अनेक कलावंतांनी दिल्लीत त्यांच्या जनतेचे प्रश्न मांडले आहेत. अशातच याच संसदेतला परेश रावल (Paresh Raval) यांचा एक भन्नाट किस्सा घडला आहे. याविषयी महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी भाष्य केलं आहे. 


श्रीरंग बारणे यांनी नुकतच आरपार कॅफेला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी परेश रावल यांचा किस्सा सांगितला. शिंदे गटाकडून मावळच्या मैदानात श्रीरंग बारणे लोकसभा लढवत आहेत. तसेच त्यांच्यासमोर ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे रिंगणात आहेत. त्यामुळे मावळात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळतेय. यापूर्वी देखील श्रीरंग बारणेंनी मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाचा मावळाचा निकाल देखील बारणेंच्या बाजूने लागणार की वेगळी गणितं पाहायला मिळणार हे येत्या 4 जून रोजी स्पष्ट होईल. 


अन् लोकसभेत परेश रावल यांना फोन आला - श्रीरंग बारणे


परेश रावल यांचा अनुभव सांगताना श्रीरंग बारणेंनी म्हटलं की, '16 व्या लोकसभेमध्ये परेश रावल आमच्यासोबत खासदार होते. परेश रावल माझे चांगले मित्रही आहेत.आम्ही सेंट्रल हॉलला एकदा बसलो होतो आणि त्यांना एक फोन आला, की अरे! नाला जाम हो गया हैं. तेव्हा ते नवीनच निवडून आले होते. त्यांना निवडून येऊन अवघे 6 महिने झाले होते. तेव्हा त्यांनी फोनवर म्हटलं की, नाला साफ करना ये भी काम मेरा हैं क्या?' हे काम आपलं नाही, हे फरक कसा करायचा या प्रश्नावर बारणेंनी म्हटलं की, असं काही नसतं. आपण समोरच्या व्यक्तीचं समाधान करायचं असतं. मी खासदार आहे का, नगरसेवक आहे, असं नसतं. आपण ते काम करायचं असतं. दरम्यान परेश रावल यांनी 2014 मध्ये भाजपकडून तिकीट मिळवलं होतं. इतकच नव्हे तर गुजरातमधून ते लोकसभेवर निवडूनही गेले होते. 


मावळमध्ये बारणे विरुद्ध वाघेरे लढत


मावळमध्ये बारणे विरुद्ध वाघेरे अशी लढत आहे. बारणेंना विजयी करण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. तर वाघेरेंना विजयी करण्यासाठीदेखील वरिष्ठांच्या सभा आणि रोड शो आयोजित केले जात आहे. मावळमध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा अशी लढत असल्यामुळे अनेकांचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे. 


ही बातमी वाचा : 


Shreyas Talpade : 'बॉलीवूडमध्ये स्वत:च्या कामाचं भांडवल करावंच लागतं', बॉलीवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या श्रेयसचं वक्तव्य चर्चेत