Sharad Ponkshe, Aadesh Bandekar : महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचे पडसाद मनोरंज क्षेत्रावर उमटत आहेत. सध्या अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आणि आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्यामध्ये सुरु असलेल्या सोशल मीडियावरील वॉरची चर्चा सुरु आहे. आता या सोशल मीडियावरील वॉरवर शरद पोंक्षे आणि आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया 
एबीपी माझासोबत बोलताना शरद पोंक्षे यांनी सांगितलं, 'आदेशचा गैरसमज झाला असणार. माझं दुसरं वादळ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यामध्ये माझ्या कॅन्ससोबतच्या लढ्यात मदत करणाऱ्यांचे मी आभार मानले आहेत. परवा मी एकनाथ शिंदे यांची पोस्ट शेअर केलेली ती पोस्ट पाहून आदेशला असं वाटलेलं असेल की, मी फक्त एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. बाकी मी आदेशनं केलेली मदत किंवा उद्धव ठाकरे यांची मदत विसरलो असं त्याला वाटलं असेल तर हा गैरसमज आहे. आमच्यामध्ये वाद नाही, आदेश माझा मित्र आहे. तो माझ्यासाठी कायम माझा मित्र राहणार आहे. आपण काही वेळेला न वाचता रिअॅक्ट होतो. वाचून रिअॅक्ट व्हावं. आत्ता ज्या घटना सुरु आहेत, त्यावरुन लोकांनी टायमिंग जुळवलं असेल माझ्या डोक्यात असं काही नव्हतं.  माझ्या पुस्तकात शिंदे साहेब, उद्धव ठाकरे यांचे फोटो आहे. कदाचित टायमिंगमुळे गैरसमज होऊ शकतो.'


आदेश बांदेकर यांची प्रतिक्रिया
'उद्धव साहेब हे सर्वांची काळजी घेतात. हे सगळं कोणी पटकन कसं विसरु शकतं? पुस्तक प्रकाशित झालं होतं तर अशी वेगळी पोस्ट शेअर करणं आवश्यकत होतं का? या प्रत्येक घटनेमागे क्रॉनोलॉजी आहे. त्यावेळेला उद्धवसाहेबांनी फोन करुन त्याची चौकशी करत होते. अशा वेळेला कसा विसर पडतो? मला ती पोस्ट पाहून वाईट वाटलं. मला गैरसमज होत नाही. पुस्तक वाचलं आहे की नाही ते त्याला माहित आहे की नाही? ही गोष्ट मला माहित नाही. अजूबाजूला वातावरण आहे ते पाहता एखादी गोष्ट शांत करायची याबाबत विचारा करावा.' असं एबीपी माझासोबत बोलताना आदेश बांदेकर यांनी सांगितलं. 


आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांची सोशल मीडियावर शाब्दिक चकमक


आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांच्यामध्ये सोशल मीडियावरील शाब्दिक चकमकीची सुरुवात शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या पोस्टनंतर झाली. शरद यांचे 'दुसरे वादळ' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचा फोटो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शरद पोंक्षे यांनी शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात ! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय' त्यानंतर आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये कॅन्सरशी झुंझ देत असताना आदेश बांदेकर यांनी मदत केली, असा उल्लेख शरद पोंक्षे करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करुन 'हा शरद पोंक्षे तुच ना?' असं कॅप्शन आदेश बांदेकर यांनी दिली. 


हेही वाचा :