Saurabh Gokhale : कलावंतांचं ढोलताशा पथक हे पुण्यातील मानाच्या गणपतींचं मुख्य आकर्षण असतं. मागील अनेक वर्षांपासून कलाकारांचं हे ढोलताशा पथक विसर्जन मिरवणुक गाजवतात. पण मागील काही दिवसांपासून हे ढोलताशा पथक चांगलचं चर्चेत आलेली आहे. काही दिवसांपूर्वी या पथकातला सदस्य आणि अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याच्या पोस्टने चर्चा सुरु झाली. त्यामुळे या पथकातील वादही चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं. 


दरम्यान माझा आता या ढोलताशा पथकाशी काहीही संबंध नाही, अशा आशयाची पोस्ट आस्तादने केली होती. त्यावर पथकातील इतर सदस्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं होतं. पण आता या सगळ्यावर अभिनेता सौरभ गोखले याने भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे आस्तादचा हा निर्णय कुणालाही पटला नव्हता असंही त्याने म्हटलंय. सौरभने नुकतीच आरपार ऑनलाईन या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्याने भाष्य केलं. 


'आम्हाला फार टोकाचा निर्णय वाटला...'


सौरभने अगदी मिश्किलपणे प्रतिक्रिया देत म्हटलं की, आम्हीही त्यावर जोक्स केलेत. हा वाद असा नव्हता, फक्त एखादा ग्रुप म्हटलं की त्यामध्ये मतभेद हे आलेच. त्याचप्रमाणे आमचं झालं. त्याची काही वेगळी मतं होती, आमची काही वेगळी मतं होती. त्याला काही गोष्टी योग्य नाही वाटल्या, आम्हाला काही गोष्टी योग्य नाही वाटल्या. फक्त त्याने जो निर्णय घेतला तो त्याला बरोबर वाटला पण आम्हाला फार टोकाचा वाटला. त्याची काही गरज नव्हती. कोणतीही गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणून सोडणं हा त्यावरचा उपाय नाही. पण हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यावर आम्ही कुणीही काही बोलणं योग्य नाही. सोशल मीडियावरही जेव्हा त्याच्या पोस्टची चर्चा झाली त्यावर आमच्यातल्या कुणीही भाष्य केलं नाही. कारण आम्हाला माहितेय की, आमची फार वैयक्तिक गोष्ट आहे, दुर्दैवाने ती सोशल मीडियावर आली.


आस्तादची पोस्ट काय होती?


आस्तादने काही दिवसांपूर्वी पोस्ट करत म्हटलं होतं की, नमस्कार.मी "कलावंत पथक" सोडलं आहे. या पथकाशी, त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही.तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करू नये. त्याच्या या पोस्टमुळे त्यांच्या पथकातील वादही समोर आला होता. ज्याची बरीच चर्चाही झाली. 


ही बातमी वाचा : 


Sachin Pilgaonkar : तर 'त्या' भूमिकेसाठी श्रियाला का नाही घेतलं? सचिन पिळगांवकरांनी सांगितलं नवरा माझा नवसाचा-2मध्ये लेकीला न घेण्याचं कारण